मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमधील आग धुमसतेय, या कारणाने लागली आग

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळे येत आहेत. गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्याचा साठा आहे. आग अधिक भडकून मोठ्या प्रमाणत धूर निघत आहे.

मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमधील आग धुमसतेय, या कारणाने लागली आग
| Edited By: | Updated on: Jul 17, 2023 | 7:58 PM

मुंबई : नवी मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये आग लागली आहे. ही आग रविवार रात्री तीन वाजता लागली. ११ तास होऊनही अद्याप आग विझली नाही. मसाला मार्केटमधील एच विंग गाळा नंबर २३ कुलस्वामी फूड्समध्ये रविवारी रात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली. त्याठिकाणी गाळ्याच्या वरच्या भागात काजू, बदाम अक्रोड, पिस्त हा सुकामेवा व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साठवण्यात आला होता.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळे येत आहेत. गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्याचा साठा आहे. आग अधिक भडकून मोठ्या प्रमाणत धूर निघत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीती पसरली आहे.

अग्निशमनच्या १३ गाड्या दाखल

रात्रीच्या वेळी गाळ्यावर प्रोसेसिंग सुरु असल्याने आग लागली आहे. आतापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनच्या १३ गाड्या दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाहीत. गाळ्यांमधील अनधिकृतपणे साठा करून ठेवण्यात आलेल्या ड्राईफ्रुट्समुळे ही आग लागली आहे.

अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल

रात्रीच्या वेळी या गाळ्यांवर पॅकिंग सुरु होती. त्यामुळे आग लागली आहे. आग दिवसा लागली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या वाशीसह सर्वच अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले. व्यापारी गाळ्यांच्या पोटमाळ्यावर देखील साहित्य आहे.

वरच्या भागावर पाण्याचा मारा

प्रत्येक गाळ्याच्या वरच्या भागावर जाऊन पाण्याचा मारा करावा लागतो. परंतु संपूर्ण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात साठवण्यात आलेल्या साहित्यांमुळे अग्निशमन जवानांना आग विझवण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे. वारंवार APMC प्रशासनाला पत्र देऊनसुद्धा सचिव आणि उपसचिव लक्ष्य देत नाही, असा आरोप केला जातोय.