तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज, एपीएमसी मार्केटवर पालिकेचा ‘स्पेशल वॉच’

काही दिवसांवरच येऊन ठेपलेला नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रेशनसाठी परदेशातून अनेक नागरिक देशात येण्याची शक्यता आहे. परदेशामधून येणाऱ्या प्रवशांच्या जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करण्यावर पालिका भर देणार आहे.

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज, एपीएमसी मार्केटवर पालिकेचा 'स्पेशल वॉच'
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज

नवी मुंबई : तब्बल 50 हून अधिक रूपे बदलू शकणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने नवी मुंबईचीही चिंता वाढवली आहे. नवी मुंबई महापालिकेने मुंबई एपीएमसी परिसरावर स्पेशल वॉच ठेवला आहे. हा परिसर कोरोनाच्या मागील लाटेत हॉटस्पॉट बनला होता. त्यामुळे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट धडकली तर इथला संसर्ग आटोक्यात आणणे मुश्किल होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आतापासूनच सतर्क झाली आहे. प्रशासनाने दोन दिवसांपासून बैठकांचा धडाका लावला आहे.

मार्केटमध्ये ‘या’ कारणामुळे पसरू शकतो संसर्ग

एपीएमसी मार्केटमध्ये मुंबईसह विविध उपनगरांतून लोकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरु असते. तसेच लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यापासून येथे कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली सुरु आहे. या मार्केटमध्ये परदेशातून विविध वस्तूंची आयात होते. याच कारणामुळे एपीएमसीमधून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार होऊ शकतो, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

परदेशी प्रवाशांवर करडी नजर

अत्यंत घटक आणि वेगाने पसरणाऱ्या नव्या व्हेरिएंटपासून खबरदारी म्हणून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांपासून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठका सुरु केल्या आहेत. व्हेरिएंटचा मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. मागील वर्षी फिलिपाईन्स देशातून नवी मुंबईत आलेल्या एका व्यक्तीमुळे कोरोनाचा मोठा प्रसार झाला होता. त्याच दृष्टिकोनातून केवळ दक्षिण आफ्रिका नव्हे, तर परदेशातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांवर विशेष लक्ष दिले जात आहे.

नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

काही दिवसांवरच येऊन ठेपलेला नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रेशनसाठी परदेशातून अनेक नागरिक देशात येण्याची शक्यता आहे. परदेशामधून येणाऱ्या प्रवशांच्या जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करण्यावर पालिका भर देणार आहे. युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत असताना तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास त्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्याच दृष्टीने नवी मुंबई महापालिका नियोजन करत आहेत. या देशांमधील जिनोम सिक्वेन्सिंग अहवालही देण्याची मागणी कोरोना टास्क फोर्सकडे केली जात आहे. नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजनासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची व्हीसी बैठक घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटच्या शिरकावाने युरोपियन देशांमध्ये हाहाकार माजवला असून भारतानेही मोठा धसका घेतला आहे. (Navi Mumbai Municipal Corporation ready to stop the third wave of corona)

इतर बातम्या

नवी मुंबई दरोडा प्रकरणी पाच जणांना अटक, तीन फरार आरोपींचा शोध सुरु

मैत्रिणींसमोर ‘चरसी’ म्हटल्याचा राग, कॉलेज विद्यार्थ्यांची मारहाण, नवी मुंबईत तरुणाची आत्महत्या

Published On - 10:20 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI