
राज्याच्या राजकारणात दोन ठाकरे एकत्र येत असल्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे.राज्यातील सध्या राजकीय परिस्थिती पाहता, गेल्या दोन दशकांपासूनचे मतभेद, दुरावा बाजूला ठेवत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. येत्या काही महिन्यांतच मुंबईसह अन्य महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवू शकतात. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झालेली पहायला मिळू शकतं. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबीर सुरू असून, टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना अजित दादांनी अनेक विषयांवर मोकळेपणे, स्पष्ट उत्तरं दिली.
राजकारणात दोन ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत. अलीकडे तुम्ही वेगळे झालात आणि दोन गट (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, अजित पवार गट) असे गट झाले. पण दोन ठाकरे एकत्र येत आहेत. त्यांच्या युतीचा महायुतीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांवरती परिणाम होणार का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला. ‘कोणी कुठे एकत्र यावं, कोणी कसं रहावं हा ज्याचा त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी तरी नाक खुपसण्याचं काही कारण नाही’ असं अजित पवार म्हणाले.
मी का नाक खुपसू ?
कोणी कुठे एकत्र यावं, कोणी कसं रहावं हा ज्याचा त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी तरी नाक खुपसण्याचं काही कारण नाही. उद्धव आणि राज यांचे वडील हे सख्खे भाऊ होते, त्यामुळे ते दोघे कझिन आहेत, एकत्र, एका घरात ते लहानाचे मोठे झाले. त्यामुळे त्यांना विभक्त व्हा असं आपण सांगितलं नाही, किंवा एकत्र या असंही आपण सांगितलं नाही.त्यांना जे योग्य वाटतं ते करण्याचा अधिकार घटनेने, संविधानाने दिला आहे, त्याबद्दल आपण चर्चा करून काय मिळवणार ? त्या दोघांना जे योग्य वाटतं, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा.
मराठीचा मुद्दा, हिंदीची सक्ती यावरून जुलै महिन्यात उद्धव व राज ठाकरे पहिल्यांदा एकत्र आले होते, वरळी डोममध्ये झालेली त्यांची भाषणं, देहबोली सर्वांनाच आठवत असेल. त्यानंतरही दोन्ही भावांनी सार्वजनिकरित्या एकमेकांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तर गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी राज व उद्धव यांची राज ठाकरेंच्या घरीच भेट झाली, आगामी निवडणुक, त्यासाठीची रणनिती यावरून त्यांच्यामध्ये अनेक तास चर्चा झाली. मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुती त्याकडे कशी पाहते, त्यावर काय भूमिका असेल असा प्रश्नही लोकांच्या मनात आहे.