अखेर राष्ट्रवादीचा माढा आणि उस्मानाबादचा उमेदवार ठरला, अधिकृत घोषणा बाकी

अखेर राष्ट्रवादीचा माढा आणि उस्मानाबादचा उमेदवार ठरला, अधिकृत घोषणा बाकी

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने उस्मानाबाद आणि माढा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित केला आहे. माढ्यातून विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, तर उस्मानाबादमधून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत केवळ अधिकृत घोषणा करणं बाकी आहे.

संजय शिंदे हे माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे बंधू आहेत. भाजपच्या मदतीने ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. शिवाय राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे नुकत्याच भाजपात प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते पाटलांचे संजय शिंदे हे कट्टर विरोधक आहेत. राष्ट्रवादीने शिंदे बंधूंना बळ दिल्यामुळेच मोहिते पाटील घराणं नाराज होतं. संजय शिंदे यांनी 2014 ला विधानसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवली होती.

अजित पवार यांच्या आणखी एका निकटवर्तीयाला उमेदवारी मिळणार आहे. उस्मानाबादमधून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांचं तिकीट निश्चित झाल्याची माहिती आहे. बार्शी मतदारसंघामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे, शिवाय तेही मोहिते पाटलांचे कट्टर विरोधाक मानले जातात. दिलीप सोपल लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोपल यांना निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचीही माहिती आहे.

माढ्यातून माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल, असं बोललं जात होतं. पण पवारांनी पुढची खेळी आखत मोहिते पाटलांच्या विरोधकांनाच रिंगणात उतरवलंय. विशेष म्हणजे उस्मानाबादमध्ये ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटलांनाही डावलण्यात आलंय. पद्मसिंह पाटलांनी उमेदवारी अर्जही आणला होता.

वाचा – तिकीट जाहीर होण्याअगोदरच पद्मसिंह पाटलांनी उमेदवारी अर्ज घेतला

Published On - 2:07 pm, Thu, 21 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI