
महापालिका निवडणुकांसाठी होणार मतदान आणि दुसऱ्या दिवशी लागणारा निकाल, याला आता अवघे काही दिवसच उरले असून त्यापूर्वी राज्यातील हरएक पक्षात रणधुमाळी सुरू झाली आहे. 23 तारेखपासून उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू झाली असून 30 डिसेंबर ही अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून उमेदवार निवडीबाबत अखेरच्या टप्प्यात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सर्व प्रमुख पक्षांमध्ये जागावाटप, उमेदवारी आणि युतीबाबत सखोल विचारमंथन चालू असून उमेदवारांची अधिकृत घोषणा शेवटच्या दिवशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे उमेदवारांच्या निवडीबाबात अजूनही गुप्तता असून अखेर कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता शेवटच्या दिवसापर्यंत ताणली जाऊ शकते.
महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. हरएक पक्षात, अंतर्गत बैठकांचा धडाका सुरू असून स्थानिक पातळीवरील समीकरणे, उमेदवारांची स्वीकारार्हता, जातीय-समाजिक गणित आणि विजयाची शक्यता यांचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या वाढल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीत सन्मानजनक तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवारांच्या अंतिम यादीला आकार देण्यात येणार असून सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे संकेत मिळत आहेत. राजकीय हालचालींमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली असून शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
ठाण्यात युतीचा फॉर्म्युला अद्यापही ठरेना
महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असल्या तरी ठाण्यातही युतीचं घोंगडं भिजत पडलं आहे. ठाण्यात युतीचा फॉर्म्युला अजूनही ठरलेला नाही. भाजप आणि शिंदे गटात जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने हा पेच कायम आहे. शुक्रवारी रात्री रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पुन्हा फॉर्म्युला संदर्भात तिसरी बैठक पार पडली. यावेळी भाजपचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत, निरंजन डावखरे, खासदार नरेश म्हस्के यांच्यात खलबत्ते झाली.
पहाटे चार वाजेपर्यंत चचालणारी चर्चा निष्फळ ठरली म्हणून कालच भाजप आमदार संजय केळकर यांनी शिंदे गटाला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. ठाणे, कल्याण महापालिकेत भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असून जागावाटपाचा तिढा नेमका कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीची सावध पावलं
एकीकडे भाजप शिवसेना युतीच्या चर्चा सुरू असतानाचा महायुतीतील आणखी एक महत्वाचा पक्ष असलेला अजित दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस हाँ पक्ष जपून पावलं टाकताना दिसतोय. भाजप आणि शिवसेना यांची युती आज जाहीर झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील पत्रकार परिषद घेऊन कोणत्या महापालिकेत कश्या पद्धतीने निवडणुक लढणार याची माहिती पत्रकार परिषदेतून देणार असल्याचे समजते. राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकीत बहुतांश पालिका निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणूक लढवणार तर मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली,नवी मुंबई,वसई-विरार,मीरा-भाईंदर,सोलापूर, अमरावती या महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे. धुळे,अहिल्यानगर या महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपची युती असेल. नांदेड,नाशिक या महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्र येत भाजपच्या विरोधात महापालिका निवडणूक लढवणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.