‘जर पक्षाची सदस्य संख्या कमी झाली तर..’ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना अजितदादांची तंबी

आज नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बोलताना अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना चांगलीच तंबी दिल्याचं पाहायला मिळालं.

जर पक्षाची सदस्य संख्या कमी झाली तर.. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना अजितदादांची तंबी
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 23, 2025 | 6:50 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह मंत्री बाबासाहेब पाटील, नवाब मलिक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, संजय बनसोडे, आमदार राजू नवघरे, आमदार राजेश विटेकर, आमदार विक्रम काळे, माजी आमदार मोहन हंबर्डे यांची उपस्थित होती. या बैठकीमध्ये बोलताना अजित पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना चांगलीच तंबी दिल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीही उपयोग नाही हे लक्षात ठेवा. पक्षाचा पुरोगामी विचार वाढवण्याचं काम चारही जिल्ह्यात करावं लागणार आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच येतील, निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर आपल्याला काम करून चालणार नाही, आता कामाला सुरुवात करावी लागेल. महामंडळाचं वाटप जवळपास झालं आहे,  36 जिल्हे डोळ्यासमोर ठेवून ते वाटप होईल. ज्या नेत्याच्या भागात सदस्य संख्या कमी होईल त्याचं कौतुक होईल, मात्र वेगळ्या पद्धतीने होईल, त्याला सांगितलं जाईल तुला आता विश्रांतीची गरज आहे, अशी तंबी या बैठकीमध्ये अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना दिली आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण महायुतीसोबत असलो तरी आपली विचारधारा आपण सोडली नाही, विकासाच्या मुद्द्यावर आपण त्यांच्यासोबत काम करत आहोत. मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर विकासाला त्यांनी अधिक प्राधान्य दिलं आहे. महायुतीत वाद होतील असं माझ्या पक्षाच्या प्रवक्त्याने, कार्यकर्त्यांनी बोललं नाही पाहिजे, ते बोलणं टाळलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महिला विचारत होत्या 2100 रुपये देणार होते त्याचं काय झालं?  महायुतीने शब्द दिला आहे पाच वर्षाचं हे सरकार आहे. लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही. गरीब महिलांसाठी ही योजना आहे. ज्या महिलांचे उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी ही योजना चालूच राहणार आहे, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.