NEET 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, आतापर्यंत पाच जणांना अटक

नीट पेपर फुटीप्रकरणात आतापर्यंत सीबीआयने एकूण पाच जणांना अटक केली आहे, तसेच एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये महाराष्ट्रातील एकाचा समावेश आहे.

NEET 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, आतापर्यंत पाच जणांना अटक
NEET EXAM
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 13, 2026 | 9:32 PM

नीट (NEET) परीक्षा वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र या परीक्षेला आता पेपरफुटीचं ग्रहण लागलं आहे. तीन मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र पेपर लीक झाल्याचं लक्षात येताच आता सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. ही परीक्ष रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच या प्रकरणात तपासाची जबाबदारी सीबीयाकडे सोपवण्यात आली आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे संपूर्ण देशभरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे, तसेच नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमधून देखील संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयने पाच जणांना अटक केलं आहे. अटक करण्यात आलेल्या पाच पैकी तीन जण हे राजस्थान जयपूर येथील आहेत, तर एक जण महाराष्ट्रातील असून, एकाला हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या नाशिक येथून नीट पेपर फुटीप्रकरणात शुभम खैरनार याला अटक करण्यात आलं आहे. तर मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांना राजस्थानमधील जयपूर येथून अटक करण्यात आली आहे. तर यश यादव नावाच्या व्यक्तीला हरियाणा येथील गुरुग्रमामधून सीबीआयने अटक केली. सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीयाकडे सोपवल्यानंतर नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान दुसरीकडे या प्रकरणात महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेला आरोपी शुभम खैरनार याच्या भावाला देखील सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. भावेश खैरनार असं चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी शुभम खैरनार याच्या भावाचं नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सीबीआयकडून भावेश खैरनार याच्या घराची देखील झडती घेतली जाणार आहे, घराची झडती आणि चौकशीसाठी भावेश खैरनार याला ताब्यात घेण्यात आलं आहे, चौकशीनंतर त्याला सोडलं जाणार आहे.

पालकांमधून संताप

नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्यानंतर परीक्षा देखील रद्द करण्यात आली त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वर्षभर अभ्यास करून आमच्या मुलांनी परीक्षा दिली, मात्र पेपर फुटल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नेट सारखी परीक्षा पारदर्शक होण्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत, विद्यार्थ्यांचे भवितव्य सक्षमपणे घडावे, आमचे मुलं सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, अशी प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे.

Follow Us