नीट पेपरफुटीप्रकरणी मुलाला अटक होताच वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले गेले 6 महिने माझा मुलगा…

नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील नाशिक आणि लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नाशिकमधून शुभम खैरनारला सीबीआयने ताब्यात घेतले असून, लातूरमधील एका कोचिंग क्लासच्या सराव परीक्षेतील ४२ प्रश्न मुख्य परीक्षेत आल्याने खळबळ उडाली आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी मुलाला अटक होताच वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले गेले 6 महिने माझा मुलगा...
neet exam
| Updated on: May 13, 2026 | 1:00 PM

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. सध्या या पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटू लागले आहेत. राजस्थान, बिहारनंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिक आणि लातूर जिल्ह्यांशी जोडले जात आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सीबीआयने (CBI) नाशिकमधून शुभम खैरनार नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

नीट पेपरफुटीप्रकरणी राजस्थान पोलिसांच्या माहितीवरून नाशिक गुन्हे शाखेने तातडीने हालचाली करत नाशिकमधील इंदिरा नगर परिसरातून शुभम खैरनार (३०) याला अटक केली. शुभम हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगावचा रहिवासी आहे. मंगळवारी संध्याकाळी सीबीआयने त्याला आपल्या ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरू आहे. या अटकेमुळे पेपरफुटीच्या रॅकेटचे जाळे महाराष्ट्रात किती खोलवर पसरले आहे, याचा अंदाज यंत्रणा घेत आहेत.

वडिलांची प्रतिक्रिया काय?

आता या प्रकरणी शुभमचे वडील डॉ. मधुकर खैरनार यांनी आपल्या मुलावरील आरोप फेटाळून लावले आहेत. माझा मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून नाशिकमध्ये बी.ए.एम.एस.चा (BAMS) सराव करत आहे. त्याला आम्ही दरमहा खर्चासाठी पैसे पाठवतो. पेपरफुटीशी त्याचा कोणताही संबंध नाही. तो निर्दोष सिद्ध होईल याची मला खात्री आहे, तरीही प्रशासनाने आपली योग्य ती चौकशी करावी,” अशी प्रतिक्रिया मधुकर खैरनार यांनी दिली.

कोण आहे शुभम खैरनार?

  • नाशिकच्या इंदिरा नगर भागातून ताब्यात घेण्यात आलेला शुभम खैरनार (३०) हा मूळचा नांदगाव येथील रहिवासी आहे.
  • राजस्थान पोलिसांकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे सीबीआयने ही कारवाई केली.
  • पेपरफुटी रॅकेटमधील मध्यस्थ म्हणून किंवा प्रश्नपत्रिका वितरण साखळीतील एक महत्त्वाचा दुवा म्हणून शुभमकडे पाहिले जात आहे.
  • शुभम गेल्या काही काळापासून नाशिकमध्ये वास्तव्यास होता. तो कोणाच्या संपर्कात होता आणि त्याने कोणाला आर्थिक लाभ मिळवून दिला, याचा तांत्रिक तपास सीबीआय करत आहे.

लातूरमधील धक्कादायक प्रकार

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक वळण लातूरमध्ये पाहायला मिळत आहे. लातूर हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. मात्र येथील एका खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटने घेतलेली सराव परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या काही दिवस आधी या संस्थेने घेतलेल्या सराव परीक्षेत जे प्रश्न आले होते, त्यातील ४२ प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले.

एका जागरूक पालकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन पुराव्यासह तक्रार दिली. सराव परीक्षेत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न जुळणे हा केवळ योगायोग असू शकत नाही, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द केली असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. देशातील विविध राज्यांतील पोलीस दलांकडून आता तपासाच्या सर्व फाईल्स सीबीआयकडे सोपवण्यात आल्या आहेत. या प्रकरणाने केवळ परीक्षेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नसून, शैक्षणिक माफियांचे जाळे किती खोलवर आहे, हे देखील उघड केले आहे.

Follow Us