
न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी बँक घोटाळा प्रकरणात बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला ताब्यात घेतलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. हितेश मेहताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये त्याने आरबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर खळबळजनक कबुली दिली आहे. बँकेमधील 122 कोटी रुपये टप्प्याटप्प्यानं काढून ओळखीतल्या लोकांना दिल्याची कबुली मेहताकडून देण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार हितेश मेहताने प्रभादेवीच्या कार्यालयातून 112 कोटी तर गोरेगावच्या कार्यालयातून 10 कोटी गायब केले आहेत. सध्या हितेश मेहता आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. हितेश मेहताला आजच अटक देखील होऊ शकते.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बँकेत तब्बल 122 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. सबंधित प्रकरणात जबाबदार असणाऱ्या हितेश मेहताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याने आरबीआय अधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये आपला गुन्हा कबुल केल्याची माहिती समोर येत आहे. १९९० पासून हितेश मेहता या बँकेत कार्यरत आहे. हितेश मेहताची चौकशी सध्या सुरू आहे. या सर्व रकमेची त्याने रोख स्वरुपात अफरातफर केल्याची माहिती समोर आली आहे.
6 महिन्यांसाठी बंदी
घोटाळा उघड झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून या बँकेवर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बँकेवर बंदीचं वृत्त समोर येताच पैसे काढण्यासाठी ठेवीदारांनी एकच गर्दी केली. अनेकांचे पैसे बँकेत अडकले आहेत. या बँकेच्या देशभरात एकूण 26 शाखा आहेत. यामध्ये लाखो ठेविदारांनी आपला पैसा गुंतवला आहे. बँकेवर बंदी आल्यामुळे ठेवीदारांची धाकधूक वाढली आहे.
आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला ताब्यात घेतलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याने घोटाळ्याची कबुली देखील दिल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरानं चांगलीच खळबळ उडाली आहे.