
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांवर बँकेतील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर १३ फेब्रुवारी २०२५ पासून रिझर्व बँकेने कडक निर्बंध लादले होते. त्यामुळे सामान्य ग्राहकांची आयुष्यभराची जमापुंजी बँकेत जमा असल्याने सर्वसामान्यांच्या जीवाला घोर निर्माण झाला होता. त्यानंतर लगोलग ठेवीदारांना ४५ दिवसांत विम्यापोटी ५ लाखांपर्यतच्या ठेवी परत करण्याची सुध्दा अशोभनीय घाई रिझर्व बँकेने दाखवली होती. त्यामुळे न्यू इंडियाच्या ठेवीदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरून ही बँक आता बुडणार असे चित्र उभे राहिले होते. परंतू आता ही बँक सारस्वत बँकेत विलीन होत असून १ ऑगस्टपासून या बँकेचा ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.
परंतु सुदैवाने सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक विलीनीकरणाचा दिलेला प्रस्ताव रिझर्व बँकेने संमत केला आहे. आणि या प्रस्तावाला आता दोन्ही बँकांच्या विशेष सर्वसाधारण सभांमध्ये मान्यता मिळाल्यामुळे १ ऑगस्टपासून न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांना कायमस्वरुपी दिलासा मिळणार आहे. त्यांच्या संपूर्ण ठेवी १०० टक्के सुरक्षित असतील असे सारस्वत बँकेने सर्व ठेवीदारांना म्हटले आहे. याबद्दल सर्व ठेवीदारांतर्फे मुंबई ग्राहक पंचायतीने सारस्वत बँकेच्या संचालक मंडळाला धन्यवाद देऊन त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
त्याचबरोबर १ ऑगस्टपासून या बँकेचे व्यवहार सारस्वत बँकेच्या नावाने सुरु होत असले तरीही न्यू इंडियाच्या सर्व ठेवीदारांनी पहिल्याच दिवशी बँकेत गर्दी करून आपल्या ठेवी काढण्याची घाई करू नये असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायत करत आहे. गेले पाच महिने आपल्या ठेवी वापरता न आल्याने या बँकेच्या सर्वच ठेवीदारांची आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होऊन त्यांना अनेक हाल -अपेष्टांना सामोरे जावे लागले होते हे जरी खरे असले तरी सारस्वत बँकेसारख्या अत्यंत विश्वसनीय बँकेने सहकार्य केल्यामुळेच आज या ठेवीदारांना संपूर्ण सुरक्षितता लाभली आहे. हे लक्षात घेऊन ठेवीदारांनी आपल्या गरजे पुरत्याच रकमा सध्या काढून सारस्वत बँकेला आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी न्यू इंडियाच्या ठेवीदारांना केले आहे.