निलेश राणे हे रवींद्र चव्हाण यांच्या पैशांवर निवडून आले, वैभव नाईकांचा जोरदार पलटवार
रवींद्र चव्हाण यांचे खरे लाभार्थी वैभव नाईक असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं होतं, निलेश राणे यांच्या या टीकेला आता वैभव नाईक यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश राणे हे चव्हाण यांच्या पैशांवर निवडून आले, असं नाईक यांनी म्हटलं.

रवींद्र चव्हाण यांचा खरा लाभार्थी वैभव नाईक असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. वैभव नाईक यांच्यावर ट्विट करत निलेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. दरम्यान त्यावर आता वैभव नाईक यांनी देखील जोरदार पलटवार केला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या पैशांमुळे निलेश राणे हे निवडून आले, असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. तसेच रवींद्र चव्हाण यांचे खरे लाभार्थी कोण? हे जनतेला माहिती आहे, असंही नाईक यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले वैभव नाईक?
‘खरं तर आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या पैशांमुळेच राणे निवडून आले, हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहिती आहे. अडीच वर्ष जेव्हा रवींद्र चव्हाण हे मंत्री होते, तेव्हा मी केलेले विकास कामं मंत्र्यांच्या माध्यमातून आपणच केली आहेत, असं दाखवण्यामध्ये आमदार निलेश राणे हे सगळ्यात पुढे होते. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचे खरे लाभार्थी कोण आहेत, हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहिती आहे. खरं तर मी शिवसेना ठाकरे गटासोबत आहे, आणि त्यामुळेच जिल्ह्यातील जनतेचा पाठिंबा मला मिळत आहे. त्यामुळे निलेश राणे हे आमदार झाले तरी मला विसरत नाहीयेत. असंही यावेळी वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
निलेश राणे यांनी काय म्हटलं होतं?
“माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही” हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे. वैभव नाईक हरणारच होते म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही हे सगळ्यांना माहीत आहे. ज्या काँग्रेसने यांच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून हे दुसऱ्या पक्षात गेले. त्यांचे दोन भाऊ माझ्यामुळे नगरसेवक झाले. रवींद्र चव्हाण यांचा खरा लाभार्थी वैभव नाईक हेच आहेत. इथून पुढे काही बोलला तर माझे पदाधिकारी उत्तर देतील’ असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आरोप-प्रत्यारोपांमुळे आता जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.