
मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केलं. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. मात्र ओबीसी समाजाचा या मागणीला विरोध आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजानेही आंदोलनाची तयारी केली आहे. ओबीसी समाजाने जरांगेंविरोधात महामोर्चाची घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा आणि आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. या विरोधात आता विदर्भात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. चंद्रपुरात ओबीसी संघटनांनी आज एक मोठी बैठक घेत जरांगेंच्या प्रयत्नांना जोरदार विरोध करण्याचे ठरविले आहे. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात उद्या 2 सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच 13 सप्टेंबर रोजी शहरात ओबीसी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
आधीपासून मराठ्यांना एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस या दोन्ही गटातून आरक्षण दिले गेले आहे. मात्र मनोज जरांगे पाटील आता ओबीसीतून आरक्षण मागत आहेत. त्यामुळे याला विरोध करण्याची भूमिका ओबीसी आंदोलकांनी घेतली आहे. राज्यात विविध ठिकाणी ओबीसी आंदोलकांच्या बैठका पार पडत आहेत. आता आगामी काळात विविध जिल्ह्यातही अशाच प्रकारचे मोर्चे आयोजित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ओबीसी नेते छगन भुजबळ भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावली आहे. त्यामुळे आता ओबीसी नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार? या बैठकीतून नेमकी काय भूमिका घेतली जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्यातरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशीच भूमिका सर्व ओबीसी नेत्यांची आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या या बैठकीत ओबीसी नेते आंदोलनाची हाक देणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.