
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला आणि मराठा समाजाला थेट आव्हान दिले आहे. आम्ही गावगाड्यात ५० टक्के आहोत, सगळे ओबीसी एकत्र आले तर तुमचं काय होईल, असा सवाल लक्ष्मण हाकेंनी विचारला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु आहेत. सरकारने ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला आहे, असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला.
येत्या ३० सप्टेंबरला पुण्यात ओबीसी समाजाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. आम्ही लवकरच ओबीसी जोडो अभियान सुरू करणार आहे. हे अभियान राज्यभर राबवून ओबीसी समाजाला एकत्रित केले जाणार आहे. ओबीसी समाजातील मंत्र्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी. जर त्यांनी समाजाची बाजू मांडली नाही, तर ओबीसी समाज त्यांना माफ करणार नाही, असा थेट इशारा लक्ष्मण हाकेंनी दिला.
मी चुकीचा आहे, असं कोणताही ओबीसी नेता म्हणलेला नाही. मी आमदार किंवा खासदाराचा मुलगा नाही, जर मी चुकीचा असेल तर मला आत टाका. सध्याची परिस्थिती जाती-जातीत भांडण लावण्याची नाही. ओबीसी समाजाने एकत्र यावे. आम्ही देखील मराठा आरक्षणाविरोधात आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. बीड ज्या पद्धतीने पेटले, तशीच परिस्थिती मुंबईतही निर्माण होऊ शकते,” असे लक्ष्मण हाकेंनी सांगितले.
गृह विभाग सामाजिक दुजाभाव करत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देणारे अनेक कारखानदार आणि वतनदार, आमदार आणि खासदार आहेत. जरांगे नावाच्या काडीला ज्वालामुखीत रूपांतर करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप लक्ष्मण हाकेंनी केला.
ओबीसी समाजाच्या हितासाठी छगन भुजबळ निश्चितपणे मंत्रिमंडळात प्रश्न विचारतील. प्रकाश सोळंके, विजय पंडित आणि बजरंग सोनावणे या नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे. जीवात जीव असेपर्यंत आम्ही लढणार आहोत. जर वेळ पडली तर आम्ही मुंबईला देखील येऊ, असा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिला.