Manoj Jarange Morcha : सरकारकडून एक दिवस आंदोलनाची परवानगी, जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, वातावरण तापलं

मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे, मात्र ही परवानगी केवळ एका दिवसासाठीच देण्यात आली आहे, यावर आता जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Manoj Jarange Morcha : सरकारकडून एक दिवस आंदोलनाची परवानगी, जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, वातावरण तापलं
| Updated on: Aug 27, 2025 | 4:49 PM

मोठी बातमी समोर येत आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंदोलन सुरू करणार आहेत. मनोज जरांगे पाटील हे मुंबईमधील आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत, मात्र त्यापूर्वीच हाय कोर्टाकडून त्यांना मोठा धक्का बसला होता.  हाय कोर्टानं त्यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मनाई केली होती. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे, मात्र त्यासोबतच काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत.

या आंदोलनाला आझाद मैदान येथे परवानगी देताना घालण्यात आलेली सर्वात मोठी आणि महत्त्वाची अट म्हणजे या आंदोलनाला केवळ एक दिवसाचीच परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोणत्या शासकीय सुट्टीच्या दिवशी व शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात येणार नसल्याचं या आदेशात म्हटलं आहे. तसेच आंदोनासाठी कमाल पाच हजार आंदोलकांची अट घालण्यात आली आहे. दरम्यान यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. आपण सर्व अटी आणि नियमांचं पालन करणार मात्र आंदोलन बेमुदत होणार असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? 

लोकशाहीचं कायद्याचं सर्व नियामांचं आम्ही पालन करणार, माझा समाज देखील पालन करणार. आम्ही हट्टी नाहीयेत. तुम्ही जे सांगितलं आहे, त्या निर्णयाचं मराठ्यांकडून तंतोतंत पालन होणार, पण आम्ही एक दिवसाचं आंदोलन करणार नाही आम्ही बेमुदत आंदोलन करणार. बाकीच्या त्यांच्या सर्व नियमांचं आम्ही पालन करणार, त्यावर मी आता प्रतिक्रिया देत नाही. मी आधी ऑर्डर बघतो आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया देतो, परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आणि न्यायालयाचे आभार मानतो. पण आंदोलन एक दिवसाचं नाही तर बेमुदत होणार,  एक दिवसाची परवानगी दिली तर करा मग एक दिवसात आरक्षण मंजूर, तुम्ही जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.