तिवरे धरण फुटीला 1 वर्ष पूर्ण, आमचं घरदार, 21 माणसं गेली, न्याय कधी? तिवरेकरांचा सवाल

एका वर्षापूर्वी आजच्याच दिवशी (2 जुलै) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तिवरे धरण फुटलं (Tiware dam breach). या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला.

तिवरे धरण फुटीला 1 वर्ष पूर्ण, आमचं घरदार, 21 माणसं गेली, न्याय कधी? तिवरेकरांचा सवाल

रत्नागिरी : एका वर्षापूर्वी आजच्याच दिवशी (2 जुलै) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तिवरे धरण फुटलं (Tiware dam breach). या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तो दिवस चिपळूण तालुक्यासाठी काळा दिवस होता. धरण नेमकं कशामुळे फुटलं? याचं कारण प्रशासनाला वर्षभरानंतरही मिळालेलं नाही. दरम्यान, या दुर्घटनेत आपलं घरदार, जवळची माणसं गमावलेल्या प्रत्यक्षदर्शींनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचीत करत आपली व्यथा मांडली (Tiware dam breach).

“तिवरे धरण फुटीच्या तीन महिन्यांअगोदरच आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं की, या धरणाला एक भगदाड पडलं आहे. तिथून पाणी झिरपतं, भविष्यात हे धरण फुटून आमच्या जीविताला धोका आहे. मात्र प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी म्हणून त्याठिकाणी एक डंपर माती आणून टाकली. धरणाच्या ज्या ठिकाणाहून पाणी झिरपत होतं तो खड्डा बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर व्हायचं ते झालं आणि त्या रात्री धरण फुटलं”, असं गावकऱ्यांनी सांगितलं.

“ज्या ठेकेदाराने हे धरण बांधलं त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही केलेली आहे. दुर्घटनेनंतर सरकार एसआयटीची स्थापना करुन आठ दिवसात धरण का फुटलं? याचा अहवाल सादर करणार होतं. मात्र, वर्षभरानंतरही तो अहवाल आलेला नाही. तो अहवाल येणार कधी? आम्हाला न्याय मिळणार का? जे कोणी दोषी आहेत ज्यांच्यामुळे  आमच्या 21 माणसांचा नाहक बळी गेला, त्यांच्यावर सरकार कारवाई करणार का?”, असे प्रश्न गावकऱ्यांना उपस्थित केले.

“एसआयटीच्या कमिटीत जिल्हाधिकारी पाटबंधारे विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्यासह पाच जणांचा सहभाग आहे. आठ दिवसात अहवाल देणार, असं सांगून ती कमिटी जी पाहणी करुन गेली ती आजतागायत आली नाही. एसआयटीचा अहवाल लवकरात लवकर सादर करुन दोषींवर लवकर कारवाई करा”, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

तिवरे धरण पुन्हा बांधण्यासाठी लघु पाटबंधारे विभागामार्फत 9 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या भागात पुन्हा एकदा मातीचेच धरण बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र गावकऱ्यांचा या मातीच्या धरणाला पूर्णपणे विरोध आहे. या ठिकाणी जर तिवरे धरण फुटीची पुनरावृत्ती करायची नसेल तर मातीच्या धरणाऐवजी सिमेंट काँक्रीटचे धरण बांधावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

“धरणाचा जो भाग फुटला आहे तो पॅचअप करुन धरण बांधण्याचा प्रयत्न झालाच तर आम्ही ग्रामस्थ त्याला पूर्णत: विरोध करु. धरण तयार होणे ही काळाची गरज आहे. पण धरण फुटीच्या घटनेची पुनरावृत्ती टाळता येऊ शकते”, असं गावकऱ्याचं म्हणणं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *