कांदा ग्राहकांना रडवणार, कांदा दरवाढीमागील कारण काय?

onion price in nashik | कांदा हे पीक कधी शेतकऱ्यांना रडवते तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू आणते. आता कांद्याने पुन्हा वांदा केला आहे. कांद्याच्या दरात उच्चांक नवीन गाठला गेला आहे. परंतु यामुळे शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. कारण शेतकऱ्यांकडे माल शिल्लक नाही.

कांदा ग्राहकांना रडवणार, कांदा दरवाढीमागील कारण काय?
onion traders
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2023 | 11:13 AM

चंदन पुजाधिकारी, नाशिक | 28 ऑक्टोंबर 2023 : कांदा हे सर्वात बेभरवशाचे पीक आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांना दर नसल्यामुळे कांदा फेकून द्यावे लागतो. कधी कांद्याला चांगला दर मिळाला तर शेतकऱ्यांकडे माल नसतो. कधी सरकारच्या धोरणामुळे कांद्याच्या दरात घसरण होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी होत असते. आता कांद्याच्या दराने पुन्हा नवीन उच्चांक गाठला आहे. कांद्याचे दर वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नाही. साठवणुकीतील कांदा सडल्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. यामुळे या दरवाढीचा फायदा अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्याचवेळी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर वाढत असल्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू येणार आहेत.

कांद्याचे दर उच्चांकावर

नाशिक जिल्हा कांद्याच्या उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध आहे. नाशिकमधील कांदा देशातच नाही तर परदेशातही जात असतो. लासलगावमधील कांद्याची बाजारपेठ आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परंतु आता आवक घटल्यामुळे कांदा भावात तेजी आली आहे. नाशिकमधील किरकोळ बाजारात कांदा 50 ते 70 रुपये किलोने विकला जात आहे. साठवणुकीतील कांदा सडल्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.

कधी होणार कांद्याचे दर स्थिर

सध्या कांद्याचे दर वाढले आहे. परंतु नवीन लाल कांदा येण्यास अजून महिनाभराचा कालावधी लागणार आहे. यामुळे आणखी काही दिवस भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना जादा दर मोजावे लागत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा सर्वसामान्यांना रडवणार आहे.

शासनाकडून 25 रुपये प्रति किलोने विक्री

लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला 14 ऑक्टोबर रोजी 2870 रुपये भाव मिळाला होता. मात्र गेल्या बारा दिवसांत कांद्याची आवक घटली आहे. यामुळे लासलगाव बाजारात कांद्याच्या दरात 65 टक्के वाढ झाली आहे. आता कांद्याला 5860 रुपयांचा दर मिळत आहे. दरम्यान ग्राहक व्यवहार मंत्रालय कांदा बाजारात आणणार आहे. नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून 2 लाख टन कांदा किरकोळ बाजारात आणणार आहे. हा कांदा 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विक्री केली जाणार आहे.

नागपुरात कांदा ७५ ते ८० रुपये किलो

नागपुरात कांद्याचे दर ७५ ते ८० रुपये किलोंवर पोहोचले आहेत. आवक कमी झाल्याने गेल्या आठ दिवसांत कांद्याच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. येत्या काळात कांद्याचे दर १०० रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा कांद्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. तसेच कांदा चाळींमध्ये साठवलेला कांदाही संपला आहे. यामुळे नागपूरच्या बाजारात कांद्याच्या आवक ३० टक्क्यांपर्यंत घटली आहे. त्यामुळे नागपूरच्या बाजारात कांदा ७५ ते ८० रुपये किलोंवर आला आहे.