
निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराबाबत विरोधकांनी 1 नोव्हेंबर रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि इतर पक्ष सहभागी होणार आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह सर्वच विरोधी नेते उपस्थित असणार आहेत. हा मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून सुरू होईल आणि मेट्रो सिनेमामार्गे मुंबई मनपा प्रवेशद्वाराजवळ थांबणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच क्यूआर कोड देखील देण्यात आला आहे.
पूर्व उपनगरातून वाहनाने मध्य रेल्वेने येणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून उतरल्यानंतर रस्ता पार करून आराम हॉटेल (कॅपिटल सिनेमा) शेजारील रस्त्याने आझाद मैदान आणि मुंबई (बॉम्बे) जिमखाना ह्याच्यामधील पायवाटेने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली येथून येणाऱ्यांनी वरीलप्रमाणे अथवा जर फ्री वे ने आलात तर पी डिमेलो रोड ने जी.पी.ओ. जवळ उतरून चालत वरील मार्गाने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
पश्चिम उपनगरातून येणाऱ्यांनी चर्चगेट स्टेशनवर उतरावे, आयकर भवन (सरस्वती रोड, महात्मा गांधी रोड) च्या गल्लीतून मुंबई (बॉम्बे) हॉस्पिटलच्या रस्त्याने चालत फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे. अथवा पुढे चर्चगेट स्टेशन समोरील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयासमोरील सिग्नल का डाव्या बाजूला वळून हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे. पश्चिम उपनगरातून मेट्रो ने येणाऱ्यांनी हुतात्मा चौक स्टेशनवर उतरावे. तेथून फॅशन स्ट्रीट वर यावे.अ न्य कोणत्याही स्टेशन वर उतरू नये, ही विनंती.
पश्चिम उपनगरातून वाहनाने कोस्टल रोडने येणाऱ्यांनी मरीन लाईन्स चर्चगेट मार्गे हुतात्मा चौक येथे उतरून फॅशन स्ट्रीट येथे पोहोचावे. दक्षिण वा मध्य मुंबईतून जे कोस्टल रोडने येणार नाहीत त्यांनी आपली वाहने गिरगाव चौपाटीला डाव्या बाजूस वळवून अथवा महालक्ष्मी मंदिर, जसलोक हॉस्पिटलमार्गे, ऑपेरा हाऊस थिएटर शेजारून, सैफी हॉस्पिटल, महर्षी कर्वे रोडने आयकर भवन येथे उतरून अथवा चर्चगेट स्टेशन येथे सिग्नलला डाव्या बाजूस वळून हुतात्मा चौकात उतरून फॅशन स्ट्रीटवर यावे.
वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोणीही मोर्चाच्या आधी थेट व्यासपीठाकडे जाणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे अशा मार्ददर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
संविधान वाचवा, लोकशाही जगवा, चलो मुंबई!
उद्या १ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘मतचोरी’ आणि मतदार यादीतील घोटाळ्यांविरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वपक्षीय ‘सत्याचा विराट मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. सर्व मतदारांनी या मोर्चात सहभागी होऊन लोकशाहीच्या संवर्धनासाठी आपला सक्रिय सहभाग…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 31, 2025
या मोर्चाबाबत ट्वीट करताना जयंत पाटील यांनी म्हटले की, संविधान वाचवा, लोकशाही जगवा, चलो मुंबई! उद्या 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘मतचोरी’ आणि मतदार यादीतील घोटाळ्यांविरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वपक्षीय ‘सत्याचा विराट मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. सर्व मतदारांनी या मोर्चात सहभागी होऊन लोकशाहीच्या संवर्धनासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. पूर्ण ताकदीने आम्ही या मोर्चात उतरणार आहोत. तुम्ही देखील या…! मोर्चाचे स्थळ – फॅशन स्ट्रीट, चर्चगेट. वेळ – दुपारी 1.00 वाजता