या विरोधात काढण्यात आला हिंदू जनआक्रोश मोर्चा, या महाराजांचाही मोर्चात सहभाग
आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या ज्या महिला अडचणीत असतील त्यांची मदत या समितीद्वारे करण्यात येईल.

अहमदनगर : महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायद्यासाठी मोर्चे निघतायत. अहमदनगरमध्येही मोठ्या संख्येनं मोर्चा निघाला. तर दुसरीकडे कायद्याआधी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केलीय. त्यावरुनही राजकीय गदारोळ सुरु झालाय. लव्ह जिहाद विरोधात कायद्यासाठी महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक मोर्चे निघण्यास सुरुवात झालीय. मंगळवारी साताऱ्यातल्या पाटणमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा निघाला. आता अहमदनगरमध्ये मोठ्या संख्येनं हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. कालिचरण महाराजही या मोर्चात सहभागी झाले.
श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर, हिंदुत्ववादी संघटना लव्ह जिहाद विरोधी कायद्याची मागणी करत आहेत. त्यासाठीच अहमदनगरमध्येही मोर्चा निघाला. दिल्लीगेट इथं एका सभेनंतर या मोर्चाची सांगता झाली.
लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी, धर्मांतरण विरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे आमदार आणि नेतेही करतात. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय. महिला बाल कल्याणमंत्री मंगल प्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली, 13 सदस्यांची आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केलीय.
आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या ज्या महिला अडचणीत असतील त्यांची मदत या समितीद्वारे करण्यात येईल. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नानंतर ज्या मुलींचा तिच्या कुटुंबीयांशी संबंध राहिलेला नाही त्यांच्यासाठी एक हेल्पलाईन नंबर असेल. तरुणी किंवा महिलेची फसवणूक झाली असेल तर समिती न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.
नोंदणीकृत, अनोंदणीकृत विवाह तसंच वाद विवाद मिटवण्यासाठी ही समिती काम करेल. खरं तर फडणवीसांच्या एका प्रतिक्रियेनं लव्ह जिहाद विरोधी कायद्यावरुन महाराष्ट्रात आणखी चर्चा सुरु झालीय. इतर राज्यांप्रमाणं आपणही पडताळणी करत असल्याचं फडणवीस म्हणालेत.
उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशनंतर महाराष्ट्रातही धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी सुरु झालीय. पण तूर्तास शिंदे सरकारनं आंतरजातीय आणि आंतरधर्मिय विवाह समन्वय समिती स्थापन केलीय.
