Gadchiroli schools closed : गडचिरोलीत पूरपरिस्थिती गंभीर, 16 जुलैपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद, प्रशासन घेतेय क्षणाक्षणाची अपडेट

महाराष्ट्राच्या सीमावर्ती असलेल्या प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती हे तीन नद्या धोका पातळीच्या वर वाहत आहेत.

Gadchiroli schools closed : गडचिरोलीत पूरपरिस्थिती गंभीर, 16 जुलैपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद, प्रशासन घेतेय क्षणाक्षणाची अपडेट
गडचिरोलीत पूरग्रस्तांना बाहेर काढताना प्रशासकीय कर्मचारी.
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 7:36 PM

गडचिरोली : मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळं गडचिरोली जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय 16 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. खासगी संस्था तसेच कार्यलयं बद असतील. सर्व अत्यावश्यक सेवा सुरळीत राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) प्राधिकरणानं यासंदर्भात पत्रक जाहीर केलंय. त्या पत्रानुसार, गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर योग्य नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, आस्थापना वगळता, शाळा, महाविद्यालय (School, College) व इतर सर्व बाबी बंद करण्यात आल्या आहेत. 16 जुलैपर्यंत हा आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी ( Collector) यांची या पत्रकावर सही आहे.

65 लोकांना सुखरूप बाहेर काढले

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग चार दिवसांपासून बंद आहे. शिरोळच्या अल्लापल्ली राष्ट्रीय महामार्ग ही बंद असल्यामुळे या दोन राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. भामरागड तालुक्यातील तालुका मुख्यालय काही घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळं तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. काल एकाचवेळी तलावाचे पाणी नागेपली शहरात शिरल्याने तिथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु प्रशासन सज्ज होऊन पूर्व पूरपरिस्थिती हाताळण्यास प्रशासनाला यश आले. जवळपास 65 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

धरणांत पाणीसाठा झाला आहे.

11 गावांत वेगवेगळ्या तुकड्या तैनात

सध्या सिरोंचा तालुक्यात अकरा गावांना अलर्ट करण्यात आले आहे. 11 गावांत वेगवेगळ्या तुकड्या महसूल विभाग पोलीस विभागाच्या वतीनं पाठवण्यात आले. नगराम या भागात काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम प्रशासनाने आज तीन वाजता केले. सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येर्रावागु नावाने असलेल्या नाल्याचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे सिरोंचा अंकिसा पातागुडम राष्ट्रीय महामार्गही पूर्णबंद आहे.सिरोंचा तालुक्यातील सोमनापल्ली या गावातूनही काही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

आपत्ती विभागात बसून क्षणाक्षणाची अपडेट

महाराष्ट्राच्या सीमावर्ती असलेल्या प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती हे तीन नद्या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात सध्या झालेले आहे. या गंभीर पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल व आपत्ती व्यवस्थापन समितीचे अधिकारी कृष्णा रेड्डी हे सकाळपासून आपत्ती विभागात बसून जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट घेत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एसआरपीएफ, सीआरपीएफ, एसडीआरएफ, गडचिरोली पोलीस, महसूल विभाग यांच्या प्रयत्नाने बचाव पथकाचे काम गडचिरोली जिल्ह्यात सध्या सुरू आहेत.