
हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने जलजीवन मिशनचे बिल थकल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. गावातीलच जलजीवन मिशनचे काम त्याने एका वर्षातच पूर्ण केले होते. त्याचे बिल थकले होते. सरकारकडून बिलं निघत नसल्याने हर्षल पाटील आर्थिक दृष्टया अडचणीत आल्याचा दावा करण्यात येत आहे. आर्थिक कचाट्यात सापडल्यानेच त्याने जीवन संपवण्याचा मार्ग निवडला. त्यावरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारविरोधात राळ उडवली आहे. त्यातच सांगली जिल्हा परिषदेने मोठा दावा केला आहे.
1 कोटी 40 लाखांची थकीत बिलं
वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी राज्य सरकारच्या जलजीवन योजनेतून कामे केली. तांदुळवाडी या गावात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावातील अनेक घरात दारात पिण्याचे पाण्याचा नळ जोडून लोकांना घरात पाणी देण्याची सोय केली. मात्र राज्य सरकारकडून दिले वेळेत न मिळाल्यामुळे आपल्या जीवनाचा शेवट केला, असा दावा करण्यात येत आहे. नातेवाईकांच्या दाव्यानुसार, त्याचे 1 कोटी 40 लाखांचे बिल थकीत होते.
जिल्हा परिषदेने काय केला खुलासा
हर्षल पाटील यांच्या आत्महत्येचा संदर्भात सांगली जिल्हा परिषदेने खुलासा केला आहे. हर्षल पाटील यांनी सांगली जिल्ह्या अंतर्गत जलजीवन मिशन चा काम घेतल नाही आहे त्यासंदर्भात कोणताच करारनामा झाला नाही. माध्यमांमध्ये आलेल्या या बातम्या खोट्या आहेत असा खुलासा सांगली जिल्हा परिषदेने केला आहे. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलीही काम नाहीत तसच त्या योजनेवर कुठलीही बिलं प्रलंबित नाहीत. सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम घेतलेली असावीत. त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाही, असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेचा खुलासा Harshal Patil Sangli ZP वाचा
गावकरी झाले संतप्त
मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या बद्दलचे वक्तव्य केले त्यावर गावकरी संतप्त झाले आहेत. तांदूळवाडी गावातील आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असं मत हर्षल पाटील यांचे चुलत भाऊ सचिन पाटील यांनी व्यक्त केलं आहे. गुलाबराव पाटील यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी ठाकरे गटाचे शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख अभिजीत पाटील यांनी केली आहे.