
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे दीड कोटींच्या थकित बिलासाठी युवा कंत्राटदाराने जीवन संपवले. शेतकरी आत्महत्येनंतर आता शासकीय कंत्राटदाराच्या आत्महत्येने राज्य हादरले आहे. सांगली जिल्ह्यातील युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येने सरकारवर टीकेची झोड उठली आहे. तर अनेक ठेकेदार बिलं निघत नसल्याने आर्थिक अडचणीत असल्याचे समोर येत आहे.
कोण आहेत हर्षल पाटील?
हर्षल पाटील हा तरुण शासकीय कंत्राटदार होता. तांदुळवाडी गावातील नागरीक आणि नातेवाईकांनी त्याच्याविषयी माहिती दिली. त्याने अगोदर कोल्हापूर जिल्ह्यात विविध शासकीय कामे केली. कोल्हापूरात चांगली कामे केल्याच्या जोरावर त्याला सांगली जिल्ह्यातही सरकारी कामे मिळाली. गावातीलच जल जीवन मिशनचे काम त्याने हाती घेतले. त्याच्या कामामुळे इतर गावातील नागरिकांनी, ग्रामपंचायतींनी त्याच्यामार्फत कामे करण्याचा प्रशासनाकडे हट्ट केल्याची आठवण नागरीकांनी सांगितली.
कोल्हापूर शहरातील कामं केल्यानंतर त्याने तांदळी येथील जल जीवनचे काम एका वर्षातच पूर्ण केले होते. इतर ठिकाणची कामं त्याला मिळाली. शासनाकडून थकीत बिल निघत नसतानाही त्याने उसनवारी करून काही ठिकाणची कामं मार्गी लावली. आपल्या नावाला बट्टा लागणार नाही, असे काम त्याने केले. पण साहित्य खरेदीसाठी त्याचा खर्च वाढला. आता बिलासाठी त्याच्यामागे तगादा लागला. थकीत बिलासाठी तो शासकीय कार्यालयात फेऱ्या मारत होता. थकीत बिल लवकर मिळावे यासाठी तो अधिकाऱ्यांना भेटला. पण त्याला यश मिळाले नाही. तो यामुळे तणावात आला आणि एक होतकरू तरुण गमवावा लागला अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.
वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी राज्य सरकारच्या जलजीवन योजनेतून कामे केली. तांदुळवाडी या गावात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावातील अनेक घरात दारात पिण्याचे पाण्याचा नळ जोडून लोकांना घरात पाणी देण्याची सोय केली. मात्र राज्य सरकारकडून दिले वेळेत न मिळाल्यामुळे आपल्या जीवनाचा शेवट केला. एक होतकरू, मनमिळावू तरूण हिरावल्याने त्याच्या मित्रांना शोक अनावर झाला.