तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?

Vijay Vadettiwar Tukaram Mundhe : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई सुरू आहे. त्यांनी आता सुट्या खाद्यतेल विक्रीविरोधात मोर्चा वळवला आहे. या निर्णयाविरोधात तक्रारीचा सूर आळवण्यात आला आहे. या वादात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उडी घेतली आहे.

तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
तुकाराम मुंढे, विजय वडेट्टीवार
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 23, 2026 | 8:19 PM

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई सुरू आहे. त्यांच्या या कामाची राज्यभर पावती सु्द्धा मिळत आहे. दूध भेसळीनंतर हॉटेल, रेस्टॉरंट, मिठ्ठाई प्रतिष्ठानांसह इतर अनेक भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. तर मुंढे यांच्या विभागाने सुट्या खाद्यतेल विक्रीविरोधात मोर्चा वळवला आहे. सुट्टे खाद्यतेल विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सीलबंद तेल विक्रीचे आदेश धडकले आहेत. त्यावरून व्यापारी नाराज झाले आहेत. तर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कोल्हापूरातील तेली समाजाच्या कार्यक्रमात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यावरून आता सरकारवर मोठा दबाव आल्याचे समोर आले आहे.

विजय वडेट्टीवार यांचा संताप

कोल्हापुरात आज तेलीक समाज मेळावा झाला. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे एकाच मंचावर होते. दोघांनी राजकीय टोलेबाजी केली. तर एकमेकांचे कौतुकही केले. यावेळी वडेट्टीवारांनी नेमका मुद्दाला हात घातला. आपल्या समाजात सर्वात पहिला शिकलेला संत म्हणून जगणाडे महाराजांचा उल्लेख आहे. प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपारिक व्यवसाय आहे. आता तेच बंद करायला निघालेत असा तक्रारीचा सूर त्यांनी आळवला. आमच्या समाजाने कधीही भेसळयुक्त तेल विकलेलं नाही आणि पाकीट मधलं तेल विकायला सुरुवात करा असं सांगतात, अशी टीका त्यांनी केली. सुट्टे तेल विक्री बंदीच्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला.

बावनकुळेंचे मोठे आश्वासन

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच विजय वडेट्टीवारांनी तक्रारीचा पाढा वाचला. अन्न आणि औषधी विभागाच्या सुट्टे तेल विक्री बंदीवरील निर्णयावर आक्षेप नोंदवला. यानंतर माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी मोठे आश्वासन दिले. सुट्टे तेल विक्रीवरील बंदीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय नेण्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी सरकारवर सर्वच बाजूने दबाव येत असल्याचे दिसत आहे. व्यापारी सुद्धा आक्रमक झाले आहेत.

तर 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने 20 ऑगस्ट 2026 रोजीपासून खुले, सुट्टे खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी आणली. आता बाजारात केवळ सीलबंद आणि लेबल असलेले तेलच विकता येणार आहे. पाकिटावर स्त्रोताची माहिती आणि खाद्यतेल मुदत(एक्सपायरी डेट) नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियम मोडल्यास 10 लाखांपर्यंत दंड आणि 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us