जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार धुसफूस, 12 फ्रंटल अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांचा एकत्र राजीनामा

| Updated on: Sep 11, 2021 | 11:59 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार धुसफूस सुरु आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या आणि स्थानिक नेतेमंडळीकडून राजकारण होत असल्याचा आरोप करत महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला.

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार धुसफूस, 12 फ्रंटल अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांचा एकत्र राजीनामा
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार धुसफूस, 12 फ्रंटल अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांचा एकत्र राजीनामा
Follow us on

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार धुसफूस सुरु आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या आणि स्थानिक नेतेमंडळीकडून राजकारण होत असल्याचा आरोप करत महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला. याचे तीव्र पडसाद जळगावात उमटले आहेत. अभिषेक पाटील यांच्यानंतर वेगवेगळ्या 12 फ्रंटल अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले आहेत. हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा ‘सेट बॅक’ मानला जात आहे.

महानगराध्यक्षांनी राजीनामा का दिला?

कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपला राजीनामा थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. पक्षाने पाटील यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करायचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, म्हणून प्रदेशकडून सूचित केले होते.

पदोन्नती की पंख छाटणी?

अभिषेक पाटील हे महानगराध्यक्ष म्हणून उत्तमप्रकारे काम करत असताना त्यांना दूर करु नये, महानगराध्यक्ष म्हणून कायम ठेवावे, अशी मागणीही काही नेत्यांकडून करण्यात येत होती. मात्र, तरीही वरिष्ठ नेत्यांकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने वैतागून अभिषेक पाटील यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाने त्यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करताना विश्वासात घेतलेले नाही. मग ही पदोन्नती आहे की पंख छाटणी? असा सवालही उपस्थित केला जात आहे. स्थानिक नेत्यांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे आपल्याला काम करता येत नाही, असाही थेट आरोप पाटील यांनी केल्याने पक्षातील ‘भाऊबंदकी’ चव्हाट्यावर आली आहे.

12 फ्रंटल अध्यक्षांचे सामूहिक राजीनामे

अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या 12 फ्रंटल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा कल्पना पाटील, युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, इत्यादी पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले.

खडसे गटाच्या पुनर्वसनासाठी अभिषेक पाटलांचा बळी?

अभिषेक पाटील यांच्या जागी एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले अशोक लाडवंजारी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर त्यांच्या समर्थकांच्या पुनर्वसनासाठी पक्षात अशाप्रकारे फेरबदल होत असून, त्याला काही स्थानिक नेतेमंडळीचे पाठबळ असल्याचा आरोप केला जात आहे. अभिषेक पाटील यांना बाजूला करण्यासाठी, ते पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सूचना ऐकत नाहीत, त्यांना अंधारात ठेऊन निर्णय घेतात, अशा प्रकारच्या तक्रारी प्रदेश पातळीवर पद्धतशीरपणे पोहचवण्यात आल्याचेही बोलले जात आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षसंघटना मजबूत होईल, असे अपेक्षित होते. परंतु, पक्षसंघटना गटातटात विभागल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

भगतसिंह कोश्यारी पुन्हा उत्तराखंडच्या राजकारणात सक्रिय होणार? चंद्रकांत पाटलांनी नियमच सांगितला

‘भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही’, एका मंत्र्याबाबत चंद्रकांत पाटालांचा खळबळजनक दावा