VIDEO : संयमाचा बांध फुटला, कोल्हापूरच्या सिये गावाच्या गावकऱ्यांची पंचगंगेत उडी, पोलिसांची मोठी दमछाक

पुनर्वसनासाठी कोल्हापूरच्या शिये गावचे नागरीक आता आक्रमक झाले आहेत. शिये गावाला 2005 साली आलेल्या महापुराचा फटका बसला होता. त्यानंतर 2019 साली आलेल्या महापुरानेदेखील सारं गाव उद्ध्वस्त केलं होतं.

VIDEO : संयमाचा बांध फुटला, कोल्हापूरच्या सिये गावाच्या गावकऱ्यांची पंचगंगेत उडी, पोलिसांची मोठी दमछाक
पुरात मरण्यापेक्षा तुमच्यासमोर नदीत मेलेलं काय वाईट? संतप्त गावकऱ्यांचा सवाल
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 5:32 PM

कोल्हापूर : पुनर्वसनासाठी कोल्हापूरच्या शिये गावचे नागरीक आता आक्रमक झाले आहेत. शिये गावाला 2005 साली आलेल्या महापुराचा फटका बसला होता. त्यानंतर 2019 साली आलेल्या महापुरानेदेखील सारं गाव उद्ध्वस्त केलं होतं. या दोन वर्षाच्या पुराच्या आठवणी ताज्या असताना यावर्षीदेखील पंचगंगा नदी खवळली. त्यामुळे यावर्षी आलेल्या महापुराचा देखील फटका गावाला बसला. त्यामुळे आता गावकरी पुनर्वसनासाठी आक्रमक झाले आहेत.

गावकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला

महापुरापासून सुरक्षित राहता यावं म्हणून गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासन-सरकारकडे पुनर्वसनाची मागणी केली. पण सरकार आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे अखेर गावकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला. त्यांनी आज पंचगंगेच्या पात्रात उडी मारुन आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आंदोलकांना नदी पात्रातून बाहेर काढलं. पोलिसांनी यादरम्यान मोठी दमछाक झाली. अखेर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं.

आंदोलकांची नेमकी भूमिका काय?

“आजही काही भाग हा पुरामध्ये राहत आहे. 2019 साली तसेच या वर्षीदेखील मोठा महापूर आला. पुरात अडकलेल्या आमच्या माणसांना बाहेर काढण्यात देखील प्रचंड त्रास झाला. हा त्रास आम्ही भोगलेला आहे. पुढच्या वर्षी देखील पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमचे हाल होऊ नये यासाठी आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. सरकारने लवकरात लवकर आमचं पुनर्वसन करावं, अशी माझी राज्य सरकारकडे मागणी आहे”, असं आंदोलक गावकऱ्याने सांगितलं.

‘…तर आम्ही नदीत जीव देऊ’

“सरकारने आमच्या पुनर्वसनाची मागणी मान्य केली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात नदीमध्ये जीव द्यायला देखील मागेपुढे बघणार नाहीत. पुरात मरण्यापेक्षा तुमच्यासमोर नदीत मेलेलं काय वाईट आहे? म्हणून आम्ही आज आंदोलन केलं आहे. आंदोलन केल्यानंतर सरकार आणि प्रशासनाला जाग आली पाहिजे. नाहीतर आम्ही पुन्हा नदीत जीव द्यायला येऊ. एकतर पुनर्वसन झालं पाहिजे नाहीतर आम्ही आमचा जीव सोडणार”, अशी भूमिका आंदोलक गावकऱ्याने मांडली.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : राज्य सरकारकडून लोकलचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे, विजय वडेट्टीवारांची माहिती, 15 ऑगस्टपासून सामान्यांसाठी लोकल सुरु!