कोल्हापुरातील मेघोली प्रकल्पाचा बंधारा फुटला, महिलेचा मृत्यू, शेकडो एकर शेतजमीन वाहून गेली

| Updated on: Sep 02, 2021 | 9:16 AM

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटलाय. मेघोली ग्रामस्थांनी रात्री उशीरा याबाबत माहिती दिलीय. बंधाऱ्याचे आउटलेट आहे त्या शेजारून बंधारा फुटल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय.

कोल्हापुरातील मेघोली प्रकल्पाचा बंधारा फुटला, महिलेचा मृत्यू, शेकडो एकर शेतजमीन वाहून गेली
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटलाय. मेघोली ग्रामस्थांनी रात्री उशीरा याबाबत माहिती दिलीय. बंधाऱ्याचे आउटलेट आहे त्या शेजारून बंधारा फुटल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील हा लघू पाटबंधारे प्रकल्प आहे. या पाण्याच्या प्रवाहात सापडल्यानं एका महिलेचा मृत्यू झालाय, तर शेकडो एकर शेतजमीन वाहून गेलीय.

दरम्यान या प्रकल्पातील पाण्यामुळे आता वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून वेदगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रात्री या बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा सुरू, हजारो लोक एकवटले; 5 सप्टेंबरला जलसमाधी घेणार!

दरम्यान, पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारपासून (1 सप्टेंबर) पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. कोल्हापूरच्या प्रयाग चिखली ते नरसिंह वाडीपर्यंत ही पंचगंगा परिक्रमा निघणार आहे. तब्बल 5 दिवस चालणाऱ्या या परिक्रमेत हजारो शेतकरी आणि स्थानिक नागरिक एकवटले आहेत. शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या 5 सप्टेंबर रोजी पूरग्रस्तांसह जलसमाधी घेऊ, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी 23 ऑगस्ट रोजी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्येच त्यांनी पंचगंगा परिक्रमेचा इशारा दिला होता. पण सरकारने या मोर्चाची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी आज पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. आज सकाळी प्रयाग चिखलीपासून ही पंचगंगा परिक्रमा सुरू झाली. त्यांनी प्रयाग संगमावरील दत्ता मंदिरात आल्यावर अभिषेक केला. त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या या परिक्रमेचा नरसोबाच्या वाडीत समारोप होणार आहे. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी राजू शेट्टी पूरग्रस्तांसह जलसमाधीही घेणार आहे.

मागण्या काय?

पुरामुळे सांगली आणि कोल्हापुराचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण शेती वाहून गेली. स्थानिकांची घरं पाण्यात बुडाली. अनेकांचे संसार मातीमोल झाले. मात्र, सरकारकडून या पूरग्रस्तांना अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे या सर्वांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. तसेच 2019च्या जीआरप्रमाणे पूरग्रस्तांना मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कुणाला वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, वाहनचालकांच्या पाठीची हाडं खिळखिळी!

भाड्याची खोली पुराने भरली, पानटपरी चालवणारी आजी पुरती खचली, गाळ उपसायलाही त्राण नाही

Kolhapur Flood : 2019 मध्ये महापुराच्या पाहणीसाठी फडणवीस 8 दिवसांनी आले होते, हसन मुश्रीफांचा टोला

व्हिडीओ पाहा :

Kolhapur Megholi project dam burst one death big damage