रोहित पवार अजित पवार यांची पक्षातील जागा घेण्याच्या तयारीत? कोल्हापूरच्या सभेत पवार कुटुंबातील सदस्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Aug 25, 2023 | 9:23 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापुरात आज जाहीर सभा झाली. या सभेला शरद पवार यांच्या गटाचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. या सभेत पवार कुटुंबातील एका व्यक्तीने महत्त्वाचं वक्तव्य केलं.

रोहित पवार अजित पवार यांची पक्षातील जागा घेण्याच्या तयारीत? कोल्हापूरच्या सभेत पवार कुटुंबातील सदस्याचं मोठं वक्तव्य
Follow us on

कोल्हापूर | 25 ऑगस्ट 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नवा भूकंप घडून आला. या भूकंपानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात आणि अजित पवार यांच्या गटात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. दोन्ही गट एकमेकांच्या विरोधी भूमिकेत आहेत. पण तरीही दोन्ही गटाच्या नेत्यांचे काही वक्तव्य पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला संभ्रमात पाडणारे आहेत.

शरद पवार यांनी सकाळीच राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. अजित पवार आमचे नेते आहेत, असं म्हटलं. नंतर त्यांनी आपल्या वक्तव्यापासून घुमजाव केला. अजित पवार आमचे नेते नाहीत. त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता पुन्हा त्यांनी संधी देता येणार नाही, असं म्हणत त्यांनी अजित पवार यांच्या परतीचा रस्ता बंद झाल्याचं नंतर स्पष्ट केलं. शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर कोल्हापुरात मोठी सभा पार पडली. यावेळी पवार कुटुंबातील एका व्यक्तीने मोठं वक्तव्य केलं.

हसन मुश्रीफ यांच्या ‘त्या’ वक्तव्याला सडेतोड उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापुरात आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत आमदार रोहित पवार यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिलं. “आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पक्षातील जागा घेण्यासाठी आले आहेत”, असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्याला आज रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“स्वाभिमानी कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. तुम्हाला इथं पाहिलं की मला एकच कळतं, आपला नादच खुळा, आपला विषयच हार्ड असतो हे कळालं. दसरा चौकात सभा का घेतली म्हणून टीका केली. पुरोगामी विचार विसरलेले लोकच अशी टीका करतात. पण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ऐतिहासिक दसरा चौकातून होते. कोल्हापूरचे लोक खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी करतात”, असं रोहित पवार आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले.

‘मी कुणाची जागा घेण्यासाठी नाही तर…’

“विचार सोडून गेलेल्या लोकांचं काय करायचं, हे तुम्हाला माहिती आहे. काही जण म्हणतात रोहितला अजित पवार यांची जागा घ्यायची आहे. पण मी कुणाची जागा घेण्यासाठी नाही तर प्रतिगामी विचाराला जागा दाखवायला आलोय. भाजपला त्यांची जागा देण्यासाठी 83 वर्षाचा युवक बाहेर पडला आहे”, असा घणाघात रोहित पवार यांनी केला.

‘नाद करायचा नाही’

“राष्ट्रवादी काँग्रेस फुटला म्हणता, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही विचार आहे. तुम्ही पक्ष फोडाल, कुटुंब फोडाल, पण विचार कसे फोडणार? लोकशाहीची ताकद पैसे आणि दबावापेक्षा मोठी आहे. वटवृक्षाच्या पारंभ्याला वाटतं की माझ्यावर हा वटवृक्ष उभा आहे. पण वटवृक्षाची मुळं खोलवर आहेत त्यामुळे याचा नाद करायचा नाही”, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.