VIDEO | आमची घरे का दाखवली नाहीत? अजितदादांच्या पाहणी दौऱ्यानंतर कोल्हापुरात नागरिकांमध्ये जुंपली

| Updated on: Jul 27, 2021 | 12:26 PM

कोल्हापूरमध्ये अजित पवारांनी पूरग्रस्त शिरोळ तालुक्यात (Shirol) पाहणी करुन, शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली आणि पंचगंगा नदीवरील पुलाची पाहणी केली. त्यानंतर स्थानिकांमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

VIDEO | आमची घरे का दाखवली नाहीत? अजितदादांच्या पाहणी दौऱ्यानंतर कोल्हापुरात नागरिकांमध्ये जुंपली
अजित पवारांच्या पाहणीनंतर स्थानिकांमध्ये वादावादी
Follow us on

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दौऱ्यानंतर पाहणी केलेल्या परिसरात स्थानिकांमध्ये वाद झडल्याचं पाहायला मिळालं. “आमची घरे का दाखवली नाहीत?” असा सवाल करत पुढे पुढे करणाऱ्यांना पूरग्रस्त नागरिकांनी जाब विचारला. कोल्हापूरमध्ये शाहूपुरी परिसर पाचव्या गल्लीत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. नुकसानीची पाहणी न केल्याने पूरग्रस्त नागरिक प्रचंड संतप्त आहेत. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

कोल्हापूरमध्ये अजित पवारांनी पूरग्रस्त शिरोळ तालुक्यात (Shirol) पाहणी करुन, शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली आणि पंचगंगा नदीवरील पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही उपस्थित होते. अजित पवारांनी शाहूपुरी आणि पंचगंगा नदीवरील पहाणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतली.

अजित पवारांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा

गेल्या आठवड्यात पावसाने थैमान घातल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील काही भागात मोठं नुकसान झालं. अजित पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांनी काल सांगली आणि साताऱ्याचा दौरा केला. कालच ते हेलिकॉप्टरने कोल्हापुरात जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे अजित पवार यांनी रस्ते मार्गे सांगली आणि साताऱ्याचा दौरा केला. त्यानंतर आज ते कोल्हापुरात दाखल झाले.

शिरोळमध्ये पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ जि. कोल्हापूर येथील जनता हायस्कूल परिसर आणि अर्जुनवाड रोड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली. पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर,खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

दोन दिवसात निर्णय 

राज्यात महापुरानं थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगली जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाईल, अशी ग्वाही दिली. राज्यात 9 जिल्हे पुरामुळे बाधित झाली आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा थोडा भाग बाधित झाला आहे. मी सगळ्या जिल्ह्याची माहिती घेतली. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही अजित पवार यांनी जाहीर केलंय. ते काल सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

संबंधित बातम्या 

Maharashtra Flood : प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाणार, 2 दिवसांत अंतिम निर्णय, अजित पवारांची ग्वाही

भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा; कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच जागा निवडा: अजित पवार

(Kolhapur Rains Shirol Shahupuri Flood Affected victims fight among themselves for not showing damage to house)