Maharashtra Flood : प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाणार, 2 दिवसांत अंतिम निर्णय, अजित पवारांची ग्वाही

सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा थोडा भाग बाधित झाला आहे. मी सगळ्या जिल्ह्याची माहिती घेतली. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही अजित पवार यांनी जाहीर केलंय.

Maharashtra Flood : प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाणार, 2 दिवसांत अंतिम निर्णय, अजित पवारांची ग्वाही
अजित पवार, उपमुख्यमंत्री


सांगली : राज्यात महापुरानं थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. राज्यात 9 जिल्हे पुरामुळे बाधित झाली आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा थोडा भाग बाधित झाला आहे. मी सगळ्या जिल्ह्याची माहिती घेतली. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही अजित पवार यांनी जाहीर केलंय. ते आज सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Decision to help the flood victims will be taken in two days)

सांगलीच्या शिराळा, वाळवा आणि पलूस भागात मोठं नुकसान झालं आहे. कोल्हापूर, रायगड, सांगली इथं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन पाहणी करणार आहेत. अनेक भागात रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरड प्रवण क्षेत्रात येणारी गावं यावेळी वाचली. मात्र, इतर ठिकाणीच दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तळीये गावात मोठा फटका बसला आहे. साताऱ्यातील आंबेघर आणि मिरगावातही मोठं नुकसान झालं आहे. वायूदलाकडून अन्नाची पाकिटं वाटली जात आहे. नुकसानाचे पंचनामे अजून झालेले नाहीत. पाणी कमी झाल्यावर नुकसानाचा भाग अजून वाढणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे सुरुच ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

‘संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदत दिली जाईल’

कोयना धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात साडे सोळा टीएमसी पाणी जमा झालंय रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. त्याचीच किंमत आपल्याला मोजावी लागली. मात्र, यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्या मागण्या ऐकुन घेतल्या आहेत. संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदत दिली जाईल. मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री सातत्याने आढावा घेत आहेत. केंद्राकडून राज्याला मदत करण्याचं काम सुरु आहे. केंद्र आणि राज्यात चांगला समन्वय सुरु आहे. राज्य सरकार कुठेही मागे हटणार नाही. दोन दिवसांत पूरस्थितीचं चित्र स्पष्ट होईल, त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्व मिळून आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

SDRF ची एक टीम कराडला ठेवण्याचा विचार सुरु

राज्यात दरवर्षी अशाप्रकारे संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्यात एसडीआरएफची एक टीम कराडला ठेवता येईल का याचा विचार सुरु आहे. रायगडला एक टीम ठेवली जाण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. NDRFच्या धर्तीवर राज्यात SDRF तैनात राहणार, असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार, मंत्री एक महिन्याचं वेतन देणार

पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त भारात रोगराईची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. औषधाचा पुरवठा कमी पडू देणार नाही. सांगली इथं पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन देत आहोत. राज्यभरातून धान्य, मदत मिळत आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार मदत करत आहे. पण जनतेनंही फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलंय. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार असल्याची घोषणाही अजित पवारांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Flood : महापुरानंतर रोगराई वाढण्याची भीती, लेप्टो, डेंग्यूसह अन्य आजार पसरु नये म्हणून मेडिकल कॅम्प उभारले जाणार- अमित देशमुख

मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर माघारी, कोयनानगरात खराब हवामान, उद्धव ठाकरे पुण्यातून मुंबईत

decision to help the flood victims will be taken in two days

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI