मराठा कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना घेरलं, दोन्ही बाजूने ‘तू तू मैं मै’, नेमकं काय घडलं?
मराठा कार्यकर्ते आणि अशोक चव्हाण आज नांदेडमध्ये समोरासमोर आले. मराठा कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना चांगलाच घेराव घालत काळे झेंडे दाखवले. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना जाबही विचारला.

नांदेड | 9 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलेलं आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 12 दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणी राज्य सरकारकडून पोलिसांच्या वतीने माफी मागण्यात आली आहे. तसेच लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. या घडामोडींदरम्यान मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे.
मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी एकीकडे उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे मराठा संघटनांकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. नांदेडमध्ये देखील आज असंच आंदोलन करण्यात आलंय. नांदेडमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अशोक चव्हाण आणि सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
अशोक चव्हाण यांना घेराव
सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना घेराव घातला. यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं? असा जाबच यावेळी विचारण्यात आला. यावेळी अशोक चव्हाण यांनीदेखील आंदोलकांना प्रत्युत्तर दिलं.
आंदोलकांकडून निषेध व्यक्त
“मराठा समाजाचा एवढा मोठा रोष असताना तुम्ही आज सभा घ्यायची गरज नव्हती. यामुळे सकल मराठाच्या वतीने तुमचा जाहीर निषेध करतो”, असं मराठा कार्यकर्ता म्हणाला. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “मीच तुमचा निषेध करतो. मला सांगू नको…चला…”, असं अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी आंदोलकांनी आपल्या डोक्यालादेखील काळी फिती बांधलेली बघायला मिळाली.
