बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांसोबत राहणार नाही; शरद पवार सर्व्हेवर आणखी काय म्हणाले?

| Updated on: Jan 28, 2023 | 9:14 AM

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून जोरदार राजकारण सुरू आहे. या चर्चेचाही पवार यांनी निकाल लावला. पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे होऊन गेली. कशाला काढायचा तो प्रश्न.

बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांसोबत राहणार नाही; शरद पवार सर्व्हेवर आणखी काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर: जनमत चाचणीचे आकडे आले आहेत. या आकडेवारीनुसार आता लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक फटका बसणार असल्याचं दिसून आलं आहे. तसेच देशपातळीवरही भाजपच्या जागा घटताना दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या तंबूत खळबळ उडालेली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या सर्व्हेवर भाष्य करून भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांच्यासोबत राहणार नाही, असं चित्रं या सर्व्हेतून दिसतंय, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.

तो सर्वे मी वाचला. आज जे सत्ताधारी आहेत, त्यांच्याविरोधात देशात जनमत आहे. महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता सत्ताधारी पक्षाच्या हातात सत्ता राहील असं वाटत नाही. यापूर्वीचे सर्व्हे पाहिले. पाच ते दहा वर्षापूर्वीचे याच एजन्सीने केलेले सर्व्हेही पाहिले तर या एजन्सीचे आकडे खरे ठरले आहेत. या एजन्सीने एकप्रकारे ही दिशा दाखवली आहे. ही दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीचे आहे असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कर्नाटकात परिवर्तन होणार

या सर्व्हेतून देशात काँग्रेसचे आकडे वाढतील असं स्पष्ट दिसत आहे. कर्नाटकात भाजपचं राज्य राहणार नाही. तिथे परिवर्तन करण्यास लोक उत्सुक आहेत. असं चित्रं सर्वत्र दिसतंय. पण उत्तर प्रदेश हे मोठं राज्य आहे. त्याची आकडेवारी आलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

विरोधकांना एकत्र आणणार

विरोधकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सर्वच पक्षांसोबत वाटाघाटी सुरू आहेत. परंतु स्थानिक पातळीवरील काही अडचणी आहेत. केरळमध्ये आम्ही डाव्यांसोबत आहोत. पण काँग्रेस आमचा विरोधक आहे. राष्ट्रीय पातळीवर आम्ही काँग्रेससोबत आहोत. असे काही प्रश्न आहेत. त्यातून मार्ग काढायचा आहे. दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरू होतंय. त्यावेळी आम्ही चर्चा करून मार्ग काढू, असंही त्यांनी सांगितलं.

केंद्राकडून ममता बॅनर्जी यांना त्रास

ममता बॅनर्जी या विरोधी आघाडी राहणार काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, केंद्र सरकार या ना त्या एजन्सीचा वापर करून ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्रास देत आहे, असं ते म्हणाले.

कशाला काढायाचा तो प्रश्न

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून जोरदार राजकारण सुरू आहे. या चर्चेचाही पवार यांनी निकाल लावला. पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे होऊन गेली. कशाला काढायचा तो प्रश्न, असं म्हणत शरद पवार यांनी हा प्रश्न उडवून लावला.