पुणे: राज्यात तब्बल अडीच वर्षानंतर भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आलं आहे. या सरकारचा एक मंत्रिमंडळ विस्तारही झाला. त्यात फक्त भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनाच स्थान देण्यात आलं आहे. भाजपने मित्र पक्षांना स्थान दिलं नाही. त्यामुळे मित्र पक्ष नाराज आहेत. खासकरून राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर हे मंत्री न बनविल्याने नाराज आहेत. त्याची सल त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपला धडा शिकवण्यासाठी संघटना बांधणी सुरू केली आहे. भाजपमध्ये असतो तर आज मंत्री झालो असतो. पण आता अशी तयारी करायची की आपल्याशिवाय सरकारच बनता कामा नये, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.