Gokul: ‘गोकुळ’वरून महायुतीत घमासान? राष्ट्रवादी-भाजपविरोधात शिवसेनेचा सूर? या मंत्र्यांनं सर्वच सांगितलं
Prakash Abitkar on Gokul: कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादन संघात शासननियुक्त चार संचालक नेमण्याचा निर्णयावरून वादळ उठलेले असतानाच महायुतीतही त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचे समोर येत आहे. या निर्णयावर भाजप आणि राष्ट्रवादीविरोधात शिवसेनेने सूर आळवल्याचे समोर येत असताना या मंत्र्यांनं मोठा दावा केला आहे.

Prakash Abitkar on Gokul: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळवरून सत्ताधाऱ्यांमध्येही वादाची ठिणगी पडल्याचा दावा करण्यात येत आहे. गोकुळमध्ये शासननियुक्त चार संचालक नेमण्याचा निर्णयावरून वादळ उठलेले असतानाच महायुतीतही त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचे समोर येत आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढून या संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर भाजप आणि राष्ट्रवादीविरोधात शिवसेनेने सूर आळवल्याचे समोर येत असताना कोल्हापूरचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांनी शिवसेना नाराज असल्याचे वृत्त फेटाळले आहे.
महायुतीत संवाद, गोकुळवरून सेना नाही नाराज
कोल्हापूरचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे सर्व घटक पक्ष पूर्णपणे एकजुटीने काम करत आहेत. गोकुळ दूध संघाच्या निर्णयाबाबत शिवसेना नाराज असल्याच्या वृत्तात तथ्य नाही. राज्य सरकार आणि महायुतीच्या सर्व प्रमुख निर्णयांमध्ये शिवसेनेचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षात चांगला संवाद आहे. घटक पक्षात कोणताही असंतोष नसल्याचा दावा आबिटकर यांनी केला.
चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप
दरम्यान गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आमदार सतेज पाटील गोकुळसंदर्भात पाच शासननियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयामागे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे षडयंत्र असल्याचा आरोप केला. या दोघांनीच असा नियम आणण्याचे पाप केल्याचा आरोप त्यांनी केला. तर हा निर्णय गोकुळच्या मतदारांचा अपमान असल्याचे ते म्हणाले. कॅबिनेटमध्ये सुद्धा याविषयीची कोणतीही चर्चा झाली नाही. तरीही हा अध्यादेश काढण्यात आला. बहुमत दडपण्यासाठीच ही खेळी खेळल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला.
9 नोव्हेंबर रोजी संघर्ष मोर्चा
शासननियुक्त पाच संचालक नेमण्याचा आणि त्यातील चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या शासन अध्यादेशाविरोधात आता कोल्हापूरात संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वात 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरातील ऐतिहासिक दसरा चौकातून संघर्ष मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.