Dapoli Crime : दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश, पैशाच्या देवाण-घेवाण व्यवहारातून घडली घटना

| Updated on: Jan 23, 2022 | 12:15 AM

गाव व आजूबाजूचे ओळखणारे लोक हा तपासाचा केंद्रबिंदू ठरविण्यात येऊन तपास पथकातील टिमला तशा सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे तपास पथकाने गावात व मयत यांच्या ओळखीचे लोकांकडे तपास करण्यात सुरुवात केली असता घटनेशी निगडीत गोष्टी समोर येण्यास सुरुवात झाली. घटनेच्या अनुषंगाने काही संशयित हेरण्यात पोलिसांना यश मिळाले.

Dapoli Crime : दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश, पैशाच्या देवाण-घेवाण व्यवहारातून घडली घटना
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश
Follow us on

दापोली : दापोली तालुक्यातील वणौशी येथील तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलण्यास दापोली पोलिसांना यश आले आहे. पैशाच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याचे उघड झाले आहे. तीन महिलांची हत्येने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र दापोली पोलिसांनी आठ दिवसातच या मृत्यू प्रकरणाचा छडा लावून आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. वृद्ध महिलांचा अज्ञाताकडून डोक्यात घाव घालून त्यानंतर त्यांना अर्धवट जाळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 150 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व घरातील पैसे चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले होते. सदर घटनेबाबत दापोली पोलीस ठाणे येथे तशी फिर्यादी यांनी अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सदर महिला या एकट्याच राहत असल्याने व वाडीतील आजूबाजूची घरेही बंद असल्याने गुन्ह्याची उकल होणे कामी अडचणी येत होत्या. (Police succeed in unraveling Dapoli triple murder case)

घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तसेच गुन्ह्याची जलद उकल करणे हे पोलिसांपुढील आव्हान असल्याने पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्याचा तपास खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद यांच्याकडे सोपविला. तसेच घडलेल्या घटनेच्या गांभीर्याप्रमाणे पोलीस अधीक्षक रत्नागिरी मोहित कुमार गर्ग यांनी स्वत: घटनास्थळी ठाण मांडून सर्व बाजूंची पडताळणी करण्यास सुरुवात करुन तपासाची सर्व सूत्रे स्वतः हाती घेतली.

गुन्ह्याच्या तपासासाठी पाच पथके तयार करण्यात आली होती

गुन्ह्याचे घटनास्थळ हे कमी लोकवस्तीचे ग्रामीण भागातील असल्याने तसेच आरोपीने घटनास्थळी कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने गुन्ह्याचा उलगडा होण्याकरीता जिल्ह्यातील हुशार अधिकारी व अंमलदार यांचे अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी-1, पोलीस उपअधीक्षक -1, पोलीस निरीक्षक -1, सहा.पोलीस निरीक्षक -6, पोलीस उपनिरीक्षक -3 याप्रमाणे 5 पथके तयार केली व त्यांना घटनास्थळाचे निरीक्षणापासून आरोपीचा शोध घेण्यापर्यंत वेगवेगळी कामे नेमून देण्यात आली होती. सदर पथकातील अधिकारी हे प्रत्येक गुन्ह्याचा पैलू प्रत्यक्षात आणून आपले कौशल्य पणाला लावत होते. त्यातच वणौशी खोतवाडी गावातील लोकांकडे कसून तपास करताना सदरील वयोवृध्द महिला या गावातील गरजू लोकांना पैसे देत असल्याचे कळले. यामुळे त्यांच्याकडे पैशाची उपलब्धता असल्याने झालेली घटना ही जाणकार व्यक्तीकडून झालेली असावी हे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांना व त्यांच्या टिमला जाणवले.

पैशाची गरज असल्याने आरोपीने हे कृत्य केले

गाव व आजूबाजूचे ओळखणारे लोक हा तपासाचा केंद्रबिंदू ठरविण्यात येऊन तपास पथकातील टिमला तशा सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे तपास पथकाने गावात व मयत यांच्या ओळखीचे लोकांकडे तपास करण्यात सुरुवात केली असता घटनेशी निगडीत गोष्टी समोर येण्यास सुरुवात झाली. घटनेच्या अनुषंगाने काही संशयित हेरण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यामध्ये त्याच गावचा रहिवाशी मात्र सध्या मुंबई येथे रहाणारा रामचंद्र वामन शिंदे (53) हा आघाडीवर होता. तपासा दरम्यान रामचंद्र शिंदे याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्याच्याकडून प्रत्येक वेळी तपास पथकाला वेगवेगळी माहिती देण्यात आली. रामचंद्र शिंदे याला योग्य व घटनेशी संयुक्तिक उत्तरे देता आली नाहीत. पोलिसांपुढील चौकशीमध्ये पोलिसांनी घटनेदरम्यानच्या त्याच्या हालचालींबाबत त्याच्याकडे चौकशी करून प्रश्नांची सरबत्ती करीत चौकशी काळात त्याच्या संशयित हालचाली पोलिसांनी टिपल्या. आपले वाईट कृत्याचे पितळ उघड झाले आहे अशी आरोपीची खात्री होताच त्याने पोलिसांपुढे आपल्या केलेल्या वाईट कृत्याची कबुली दिली. आपण कर्जबाजारी असून पैशाची खूप गरज असल्याने आपण हे कृत्य केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. गुन्हा उघडकीस आला असला तरी देखील इतर पैलूवर तपास चालू असून त्यादृष्टीने पुढील अधिक तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे. सदर गंभीर गुन्ह्याच्या तपासादरम्यान राजेंद्र सिंह अपर पोलीस महासंचालक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन तपास पथकाला लाभले. (Police succeed in unraveling Dapoli triple murder case)

इतर बातम्या

Wardha : कदम डॉक्टरच्या घरातील ‘त्या’ खोलीत आढळला कुबेराचा खजिना, तब्बल 97 लाख 42 हजार हस्तगत

अंधेरीत महिला वकिलासोबत ATMमध्ये घडला बाका प्रसंग! आधी त्यानं मागून डोक्याचा मुका घेतला, मग…