नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे SP ना निर्देश, पडळकरांना दणका!

| Updated on: Aug 20, 2021 | 2:30 PM

नियम तोडून बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत, असं सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. पडळकर स्पर्धेवेळी मैदानावर उपस्थित नव्हते तरीही ही स्पर्धा होण्यात त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन त्यांच्यावर कारवाई करु शकतात.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे SP ना निर्देश, पडळकरांना दणका!
नियम तोडून बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत, असं सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
Follow us on

सांगली :  नियम तोडून बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत, असं सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. माझं जिल्हा पोलिस अधिक्षकांशी बोलणं झालंय. त्यांच्या नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत, असं सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे. (Sangali Collector order SP take Action Against orgnizer bullock Cart Race)

न्यायालयाची बंदी असताना आज सकाळी पहाटे साडे वाजण्याच्या सुमारास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी झरे गावालगत एका मैदानावर बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं. कायद्याने बंदी असल्याने कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा पोलिस प्रशासनाने घेतला होता. मात्र कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत पार पडणारच, असा निर्धारच पडळकरांनी केला होता. त्यानुसार पडळकर आणि त्यांचे समर्थक कामाला लागले. आणि शासन प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवून पडळकर समर्थकांनी स्पर्धा भरवून दाखवली.

सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश

“बैलगाडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात शर्यतीचं आयोजन होणार होतं, ते झालेलं नाही, परंतु आमच्याकडे काही रिपोर्ट्स आलेत, त्यानुसार चार-पाच बैलगाड्यांनी शर्यतीत भाग घेतला. या संबंधी सांगलीच्या पोलीस अधिक्षकांशी माझं बोलणं झालेलं आहे. याची संपूर्ण सखोल चौकशी करुन याविषयी संबंधितांवर कायदेशी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत”, अशी प्रतिक्रिया सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

गोपीचंद पडळकरांना दणका

सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिल्याने गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. जरी ते स्पर्धेवेळी मैदानावर उपस्थित नव्हते तरीही ही स्पर्धा होण्यात त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन त्यांच्यावर कारवाई करु शकतात.

पडळकर समर्थकांचा गनिमी कावा

झरे गावात बैलगाडा शर्यत पार पडणार होती. मात्र पोलिसांनी गावच्या मुख्य मैदानाची धावपट्टीच उखडून टाकली होती. त्यानंतर मात्र पडळकर समर्थकांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास तिथूनच पाच किमी अंतरावर दुसऱ्या एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली.

या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. तसंच ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्ताने पडळकर समर्थकांनी पोलिस आणि प्रशासनाला मोठा गुंगारा दिल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांना गाफील ठेऊन ही शर्यत पार पडली.

स्पर्धेनंतर गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

“काही शेतकऱ्यांनी, बैलगाडा चालक मालकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली असल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमांतून कळत आहे. आम्ही आणखी त्या ठिकाणी गेलेलो नाही. झरे गावात मोठा पोलिस फौजफाटा होता. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला. पण आता आम्हाला काही शेतकऱ्यांनी स्पर्धा पार पाडली आहे, अशी माहिती कळतीय”

तुमच्याच समर्थकांनी ही शर्यत पार पाडली का? असा प्रश्न विचारल्यावर पडळकरांनी दावा खोडून काढत, “बैलगाडा हा कोणताही समर्थक नाही. बैलगाड्याला जात, पात, धर्म, प्रांत काहीही नाही… गोवंश हा वाचवला पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, अशी आमची साधी भूमिका आहे. जर आपण गोवंश जतन केला नाही, तर येणाऱ्या पिढीला आपल्याला चित्रात बैल दाखवण्याची वेळ येईल”, असं पडळकर म्हणाले.

(Sangali Collector order SP take Action Against orgnizer bullock Cart Race)

हे ही वाचा :

मुख्य मैदानावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रातोरात समर्थकांनी दुसरं मैदान बनवलं, गोपीचंद पडळकरांचा ‘गनिमी कावा’ यशस्वी!