कृष्णा नदीचं पाणी सांगलीत शिरलं, तर कोल्हापूरजवळ हायवे अजूनही बंद, 20 किमीची भलीमोठी रांग

| Updated on: Jul 24, 2021 | 10:23 AM

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरलं आहे. (Sangli flood)

कृष्णा नदीचं पाणी सांगलीत शिरलं, तर कोल्हापूरजवळ हायवे अजूनही बंद, 20 किमीची भलीमोठी रांग
Sangli flood
Follow us on

सांगली: गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरलं आहे. तर पावसाचं पाणी हायवेवर आल्याने या हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. कोल्हापूर हायवेर 20 किलोमीटरची भलीमोठी रांग लागली आहे. त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. (Sangli: krishna river breaches its banks, nears warning level)

कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 50 फुटांवर पोहोचली असून सांगलीतल्या नदीकाठी असणाऱ्या काही भागात नदीचे पाणी शिरले आहे. सांगलीतल्या बाजारपेठांमधला काही भाग सध्या पाण्याखाली आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने सांगली शहरातून कोल्हापूरकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली आला आहे. त्यामुळे इथली वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आलीय. काही रस्ते पाण्याखाली आल्याने पर्यायी मार्गाचा विचार केला जातोय. पण कालपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होताना दिसत आहे.

हरिपूरमध्ये शेकडो घरांत पाणी

सांगलीतल्या हरिपूर रोडवरील शेकडो घरांत पाणी शिरलं आहे. दोन दिवसांपासून जवळपास 6 हजार कुटुंबांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे. सांगलीतल्या सर्व खाजगी शाळा महापालिकेने ताब्यात घेतल्या असून तिथे काही जणांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

कोल्हापुरात रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

कोल्हापूरच्या शिरोळ येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून अनेकांना सुखरूप घराबाहेर काढण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. शिरोळच्या रिलीफ कॅम्पमध्ये सर्व स्थलांतरीत नागरिकांना ठेवण्यात आले आहे.

दूध पुरवठ्यावर परिणाम

पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे दुधाची आवक खंडित होण्याची भीती आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण येथे आलेल्या पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलन आणि वाहतूकीवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विक्रेत्यांकडे एका दिवसाचा दूधाचा साठा असला तरी पूरस्थिती, पाऊस कायम राहिल्यास आणि वाहतूक पूर्वपदावर न आल्यास दूधाचा पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूर येथील गोकूळ दूध उत्पादक संघ आणि गुजराथमधील अमूलकडून साधारण 22 लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. शिवाय सांगली-सातारा येथून इतरही काही दूध संघांकडून मुंबईला दूध पुरवठा होतो. सध्या कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पूरस्थिती गंभीर असून अनेक महामार्ग, रस्ते बंद आहेत. या भागांतील गोठ्यांवरही पूराचा परिणाम झाला आहे. त्यामुळे गोकुळच्या दूध संकलनात काहीशी घट झाली आहे. मराठवाड्यातून मिळणारे आणि महानंदाचे दूध मुंबईत येते. ते मुंबई, ठाणे आणि उपनगरांची गरज पूर्ण करण्याएवढे असल्याचे दिसत नाही. कर्नाटकाला जोडणारे अनेक मार्गही सध्या बंद झाले आहेत. त्यामुळे तेथून येणाऱ्या दीड ते दोन लाख लिटर दूधाची वाहतूक कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Sangli: krishna river breaches its banks, nears warning level)

 

संबंधित बातम्या:

पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

जनता पुरात, पालकमंत्री रात्रीत मुंबईत, हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री : चित्रा वाघ

दरड कोसळण्याचा धोका असलेल्या डोंगरउतारावरील गावांसाठी कायमस्वरुपी धोरण करणार : एकनाथ शिंदे

(Sangli: krishna river breaches its banks, nears warning level)