बोगस बियाण्यांवरील धाडीवरून अमोल मिटकरी यांचे गंभीर आरोप, कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणतात,…

| Updated on: Jun 10, 2023 | 7:05 PM

अकोल्यात कृषी कंपन्यांवर कृषी विभागाच्या धाडीचे सत्र सुरू असताना अमोल मिटकरी यांनी हे वसुली पथक असल्याचा आरोप केलाय. मात्र हे धाड सत्र बोगस नसून ह्या धाडीचे आदेश मीच दिल्याचा खुलासा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

बोगस बियाण्यांवरील धाडीवरून अमोल मिटकरी यांचे गंभीर आरोप, कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणतात,...
Follow us on

गणेश सोनोने, प्रतिनिधी, अकोला : गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात कृषी विभागाचे धाड सत्र सुरू आहे. यात काही गोडावूनसुद्धा सील करण्यात आले आहेत. कृषी विभागाची पुण्याची टीम असल्याचं संगितलं जातंय. यात सुमारे 100 च्या जवळपास औषधी कंपन्यांवर कारवाई केल्याची माहिती हाती आली आहे. मात्र कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहायक जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आणि बोगस बियांण्यामध्ये ज्याच्यावर गुन्हा दाखल असा भट्टड नावाचा एक इसम गैरव्यवहार करतो. गेल्या काही दिवसांपासून अधिकार नसताना ही कारवाई करत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय. शिंदे-फडणवीस सरकार आई-बहिणीच्या सोबतच आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं आहे, असा आरोपही मिटकरी यांनी केला आहे.

सत्तार म्हणतात, आदेश मीच दिले

कृषी विभाग धाडी टाकतेय, याचे आदेश मीच दिल्याचा खुलासा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर खरीप हंगामासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली. त्यात तक्रारींचा विषय घेण्यात आला. त्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात होणाऱ्या बोगस बियाणे, बोगस खते आणि बोगस औषधी यांच्या कंपनीवर धाडी टाकून तपासणी मोहीम सुरू केली. असा खुलासा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देत आरोप प्रत्यारोप करणाऱ्यांच्या थोबाडीत लगावली. अश्याप्रकारे शेती उपयोगी बोगस बियाणे, खते, औषधी विकणाऱ्या कंपनीच्या संचालकांना दहा वर्षांची शिक्षा व्हावी, यासाठी येणाऱ्या अधिवेशनात मुद्दा मांडणार असल्याचेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

 

हे सुद्धा वाचा

माझ्या अवतीभवती अनेक लोकं

अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहायक, गुन्हे दाखल असलेला एक व्यक्ती धाडीमध्ये होता, असाही आरोप करण्यात आला होता. याच स्पष्टीकरण देत सत्तार यांनी माझा पीए मुंबईत असतो. माझ्या अवतीभोवती अनेक लोक असतात. म्हणून कुणावर गुन्हे दाखल आहेत, कुणावर नाही हे मला माहीत नसते, अशी सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे.

अकोल्यात कृषी कंपन्यांवर कृषी विभागाच्या धाडीचे सत्र सुरू असताना अमोल मिटकरी यांनी हे वसुली पथक असल्याचा आरोप केलाय. मात्र हे धाड सत्र बोगस नसून ह्या धाडीचे आदेश मीच दिल्याचा खुलासा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.