VIDEO: दगडफेक, लाठीमार आणि कडकडीत बंद, राज्यातील हिंसक घटनांचे 5 महत्त्वाचे व्हिडीओ!

| Updated on: Nov 12, 2021 | 9:11 PM

त्रिपुरातील हिंसेच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण झाला. अमरावती, नांदेड, परभणी, मालेगाव, नाशिकमध्ये मुस्लिमांनी प्रचंड मोर्चे काढत जोरदार आंदोलन केलं.

VIDEO: दगडफेक, लाठीमार आणि कडकडीत बंद, राज्यातील हिंसक घटनांचे 5 महत्त्वाचे व्हिडीओ!
Muslim protestants
Follow us on

अमरावती: त्रिपुरातील हिंसेच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण झाला. अमरावती, नांदेड, परभणी, मालेगाव, नाशिकमध्ये मुस्लिमांनी प्रचंड मोर्चे काढत जोरदार आंदोलन केलं. काही ठिकाणी तर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रचंड लाठीमार केला. तरीही जमाव हटत नसल्याने अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला जात आहे. या शहरातील आंदोलनाचे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

भिवंडीत मोहल्या मोहल्यात बाईक रॅली

त्रिपुरातील घटनेनंतर भिवंडीतही तणाव निर्माण झाला. मुस्लिम तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवला. बघता बघता शेकडो मुस्लिम तरुण एकवटले. त्यानंतर या तरुणांनी मोहल्या मोहल्यातून बाईक रॅली काढून घटनेचा निषेध नोंदवला. ही रॅली सुरू असतानाच शहरातील सर्व दुकाने बंद केली. त्यामुळे शहरात अत्यंत शुकशुकाट पसरला होता. सार्वजनिक आणि खासगी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अचानक वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली होती. अनेक तरुण रस्त्यावर, गल्लोगल्लीत फिरून दुकाने बंद करताना दिसत होती.

अमरावतीत 20 ते 22 दुकाने फोडली

अमरावती मध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या15 ते 20 हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी जयस्तंभ चौकातील व शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली. मोर्चा दरम्यान मोर्चेकऱ्यांनी भाजप विरोधात व आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते. तर यात दोन पोलीस कर्मचारी दगडफेक झाल्याने जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या मुस्लिम मोर्चाला पूर्णपणे गालबोट लागले.

मालेगावात पोलिसांवरच दगडफेक

मालेगावातील काही मुस्लिम संघटनांनी बंद पुकारला होता. या बंदला मालेगावसह मनमाडमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, दुकानदार, नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून त्रिपुरा येथील घटनेचा निषेध केला. दुपारपर्यंत सर्व बंद सुरळीत सुरु होता. बंद शांततेत पार पाडत हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम संघटनांनी केली. मात्र काही ठिकाणी याला अपवाद दिसला. काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरुच ठेवली होती. या दुकानदारांवर दबाव टाकून बळजबरीने दुकाने बंद करण्याच्या आणि मोर्चा काढण्याच्या उद्देशाने काही लोक नवीन बस स्थानक परिसरात एकत्र गोळा झाले होते. मात्र पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवले आणि माघारी पाठवले. यामुळे जमावातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही जमावावर सौम्य लाठी चार्ज केला.

नांदेडमध्ये दोन पोलीस जखमी

नांदेडमध्येही मुस्लिमांनी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जमावाकडून शिवाजीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर अचानक दगडफेक सुरु करण्यात आली. या दगडफेकीत अनेक चारचाकी गाड्या, दुचाकीचं नुकसान करण्यात आलं. तसंच परिसरातील दुकानांवरही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. दुकानातील काचा फोडून वस्तूंचं मोठं नुकसान करण्यात आलं. पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रू धुराच्या नकळांड्या फोडाव्या लागल्या. तसंच सौम्य लाठीमारही करण्यात आला. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी देगलूर नाका परिसरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, या दगडफेकीत दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

संबंधित बातम्या: 

अमरावतीत मुस्लिम संघटनांकडून त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ दुकानं बंद, मोर्चाला हिसंक वळण, 2 पोलीस जखमी

VIDEO: त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद, काही शहरांमध्ये तणाव; अमरावतीतील रॅलीला हिंसक वळण

VIDEO: माथी भडकवणाऱ्या एकाही समाजकंटकाला सोडू नका, कठोर कारवाई करा, शंभुराज देसाई यांचे आदेश