पाऊस नसतानाही अचानक अजस्त्र लाटा उसळल्या; गणपतीपुळ्यात समुद्राच्या पोटात काय घडतंय?

पावसाला अद्याप सुरुवात झालेली नसताना गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर अचानक अजस्त्र लाटा उसळल्या आहेत. मंदिरापर्यंत या पाण्याच्या लाटा आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पाऊस नसतानाही अचानक अजस्त्र लाटा उसळल्या; गणपतीपुळ्यात समुद्राच्या पोटात काय घडतंय?
Ganpatipule beach
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 12, 2023 | 12:21 PM

रत्नागिरी : राज्यात अजून पावसाळा सुरु झालेला नाही. मान्सूनने काल राज्यात दस्तक दिली असली तरी म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नाही. राज्यातील काही भागात हलक्या आणि तुरळक सरी पडल्या आहेत. तास, अर्धातास एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे साधी जमीनही ओली झालेली नाही. कुठे पाणीही तुंबलेले नाही. फक्त वारे वाहत आहेत. राज्यातील सर्वच भागात हीच परिस्थिती आहे. राज्याच्या बहुतांश भागात तर पावसाचा थेंबही पडलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातही तुरळक सरी कोसळल्या आहेत. म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पण असं असतानाही गणपतीपुळे येथे समुद्र किनाऱ्यावर अचानक अजस्त्र लाटा उसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. समुद्राच्या पोटात काय घडतंय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

गणपतीपुळ्यात अजूनही पाऊस आलेला नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून गणपतीपुळ्यात समुद्राला उधाण आलं आहे. प्रचंड भरती आली आहे. आज तर गणपतीपुळ्यात समुद्र किनाऱ्यावर अजस्त्र लाटा उसळल्या. सुमारे साडे पाच मीटर एवढ्या उंचीच्या या लाटा उसळल्या आहेत. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरून थेट मंदिरापर्यंत समुद्राचे पाणी घुसले आहे. या अजस्त्र लाटांनी समुद्र किनाऱ्यावर दाणादाण उडवली आहे. लाटा उसळताच सर्वांचीच एकच धावपळ उडाली. पर्यटक आणि किनाऱ्यावरील दुकानदारांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. पाऊस नसतानाही समुद्र अचानक खवळल्याने पर्यटक भयभीत झाले आहेत. साधारणपणे मुसळधार पाऊस असताना एवढ्या उंच लाटा उसळत असतात. मात्र, पाऊस नसतानाही लाटा उसळल्याने पर्यटक आणि ग्रामस्थ धस्तावले आहेत.

पर्यटकांना मज्जाव

बिपरजॉय चक्रवादळामुळे या लाटा उसळल्याचं सांगितलं जात आहे. या वादळाचा गणपतीपुळे किनारपट्टीला तडाखा बसल्याने समुद्र किनारी अजस्त्र लाटा उसळल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे पर्यटकांना किनाऱ्यावर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जोपर्यंत समुद्र शांत होत नाही, तोपर्यंत कुणीही समुद्र किनाऱ्यावर फिरकू नये, असे आदेशच जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. तसेच पर्यटक या काळात समुद्र किनारी जाऊ नये म्हणून प्रशासन त्यावर वॉच ठेवून आहेत.

कालही पाण्याची पातळी वाढली

दरम्यान, काल गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली होती. समुद्राचे पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांमध्ये शिरले होते. त्यात पर्यटकांचे सामान देखील वाहून गेले होते. तसेच समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी आले होते. बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलल्याने समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली होती. दोन दिवस पाण्याची पातळी वाढलेली राहणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. त्यामुळे कालपासूनच प्रशासन सतर्क झालं होतं.