ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्यांना पाच ते सहा तास उशीर

ओव्हरहेड वायर तुटल्याने नाशिक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. शनिवारी मध्यरात्री मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर नाशिक-देवळाली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्यांना पाच ते सहा तास उशीर
| Updated on: Jul 20, 2025 | 9:10 AM

भारतीय रेल्वेने रोज लाखो जण प्रवास करतात. कधी कधी रेल्वेत किंवा रेल्वे मार्गांवर होणाऱ्या तांत्रिक बिघाडाचा फटका हजारो प्रवाशांना बसत असतो. शनिवारी मध्यरात्री देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक गा़ड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत. रेल्वेकडून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. पंचवटी, सेवाग्राम, गरीब रथ, हावडा मेल, राजधानी एक्सप्रेस, मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत आहेत.

नाशिकरोड स्थानकाजवळ घडली घटना

ओव्हरहेड वायर तुटल्याने नाशिक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. शनिवारी मध्यरात्री मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर नाशिक-देवळाली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली. ही घटना घडण्याच्या थोड्यावेळा पूर्वी अस्वली ते पाडळी दरम्यान सुद्धा वायर तुटली होती. ती ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे पूर्ण झाल्यावर नाशिकरोड जवळ वायर तुटली. रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून ओव्हरहेड वायर बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत

नाशिकजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेची अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावात आहेत. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवश्यक तेवढी माहिती देण्यात येत आहेत. तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईत आज मेगाब्लॉक

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते विद्याविहार हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी ते वांद्रे आणि चुनाभट्टीपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गांवर गोरेगाव ते बोरिवली पर्यत सकाळी 10 ते 3 पर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान रेल्वेकडून तांत्रिक कामे करण्यात येणार आहे.

कल्याणहून नाशिकला जाणाऱ्या रेल्वे गाड्या वळवल्या

नाशिक आणि इगतपुरी दरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंटमध्ये बिघाड झाल्याने कल्याणहून नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास हा ब्रेकडाऊन झाला आहे. पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत असले तरी, रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. या बिघाडामुळे कल्याणहून इगतपुरीकडे जाणाऱ्या सात गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यापैकी सहा गाड्या वसई रोडमार्गे वळवण्यात आल्या आहेत, तर साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे. कल्याण स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. अनेक प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दिवा येथून या गाड्या वळवण्यात येत असल्याने, कल्याणहून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी दिव्यात यावे लागत आहे.