भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार, सदावर्तेंनी शिवसेना ठाकरे गटाला डिवचलं, म्हणाले….

भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती, त्याला आता गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्युत्तर दिलं असून, त्यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच डिवचलं आहे.

भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार, सदावर्तेंनी शिवसेना ठाकरे गटाला डिवचलं, म्हणाले....
गुणरत्न सदावर्ते
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 26, 2026 | 6:08 PM

भारत सरकारकडून रविवारी पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 113 जणांना पद्मश्री, 13 जणांना पद्मभूषण तर 5 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावाचा देखील समावेश आहे. भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. दरम्यान भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. आता त्यावर गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा, भगतसिंह कोश्यारी यांच्यासारख्या एका अभ्यासू व्यक्तीला पुरस्कार मिळाला तर शिवसेना ठाकरे गटाला का टोचत आहे? असा सवाल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?  

आज प्रजासत्ताक दिन आहे, देशातच नाही तर भारताबाहेर देखील भारतीय नागरिक  मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करतात, प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा, भगतसिंह कोश्यारी यांच्यासारख्या एका अभ्यासू व्यक्तीला पुरस्कार मिळाला तर शिवसेना ठाकरे गटाला का टोचत आहे? असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. ज्यांना तारतम्य नसतं, त्यांना शिमगा आणि दिवाळीमधला फरक कळत नाही, असे अविचारी लोक आहेत. संजय राऊत काहीही बोलतात, संविधानिक पदावर राहिलेल्या व्यक्ती बद्दल बोलतात, असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. आज प्रजासत्ताक दिन आहे. पण प्रजेला शरद पवारांनी विश्वासात घेतलं नाही, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.  लोकतंत्रची हत्या केली अशी भाषा संजय राऊत करत आहेत. अर्णब गोस्वामी यांना डांबलं, त्यावेळी तुमची लेखणी बुळबुळीत झाली होती का?  आम्हाला अटक केली तेव्हा परवानगी घेतली होती का? असा सवाल यावेळी सदावर्ते यांनी केला आहे.