
मुंबईत दादर शिवाजी पार्क येथे मीनताई ठाकरे यांचा पुतळा आहे. शिवसैनिक त्यांना आदराने माँ साहेब म्हणतात. या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज रंग फेकण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार शिवसैनिकांना समजल्यानंतर तिथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले. वातावरण तापलं होतं. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास उद्धव ठाकरे तिथे आले. त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “आजचा प्रकार अत्यंत निंदनीय होता.ज्याला स्वत:च्या आई-वडिलांची नाव घ्यायला शरम वाटते, त्याने हे केलं असावं. महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“बघू पुढे काय होतं. पोलीस म्हणतात की, आम्ही शोधून काढू. दोन प्रकारच्या व्यक्ती यामागे असू शकतात, ज्यांना स्वत:च्या आई-वडिलांच नाव घ्यायला लाज वाटते, शरम वाटते अशा लावारिस व्यक्तीने हे केलं असावं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘अशा लावारिसने हे केलं असावं’
“बिहारमध्ये मोदींच्या मातोश्रीचा अपमान केला. त्या निमित्ताने बिहार बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. तसा हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न असू शकतो” असं उद्धव ठाकरे म्हणाले. आठ-दहा वर्षांपूर्वी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासोबत असाच प्रकार घडला होता, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “भावना त्यावेळी तीव्र होत्या, आजही तीव्र आहेत. आम्ही शांत रहायला सांगितलं आहे. मी म्हटलं तसं यामागे दोन प्रकारच्या व्यक्ती असू शकतात. ज्याला आई-वडिलांच नाव घ्यायला शरम वाटते, अशा लावारिसने हे केलं असावं”
याचं प्रत्युत्तर नक्कीच मिळेल
हे गांडू लोकांचं काम असल्याचे म्हणत मिलिंद नार्वेकर यांनी झालेल्या प्रकाराबाबत संतप्त शब्दांत निषेध नोंदवला.तर कोणीतरी पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न केला आहे, सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय, अशा समाजकंटकांना याचं प्रत्युत्तर नक्कीच मिळेल असं म्हणत शिवसना (ठाकरे गट ) नेते अनिल देसाई आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. या प्रकरणात बीएनएस कलम 298 अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.