आदिवासी कुटुंब, पालघरमधील साधू हत्याकांड अन् भाजप प्रवेश… काशिनाथ चौधरी नेमके कोण?

पालघरच्या गडचिंचले साधू हत्याकांडातील कथित संबंधांवरून भाजपने काशिनाथ चौधरींना पक्षात प्रवेश देण्याचा प्रयत्न केला. पण २०२० मध्ये भाजपनेच चौधरींवर आरोप केल्यामुळे तीव्र टीका झाली. या राजकीय नाट्यानंतर भाजपने तात्काळ चौधरींचा प्रवेश स्थगित केला.

आदिवासी कुटुंब, पालघरमधील साधू हत्याकांड अन् भाजप प्रवेश... काशिनाथ चौधरी नेमके कोण?
Kashinath Chaudhary
| Updated on: Nov 18, 2025 | 1:28 PM

पालघरच्या गडचिंचले येथे जमावाकडून झालेल्या दोन साधूंच्या हत्येला पाच वर्ष उलटली आहे. या हत्येप्रकरणी भाजपने ज्यांच्यावर तीव्र आरोप केले होते त्याच काशिनाथ चौधरी यांना पक्षात प्रवेश देणे भाजपला चांगलेच महागात पडले. या प्रकरणावरुन विरोधकांनी भाजपवर चांगलीच टीका केली आहे. काशिनाथ चौधरी यांना पक्षात प्रवेश देण्याच्या मुद्द्यावरुन कोंडीत पकडल्या गेलेल्या भाजपने तात्काळ त्यांच्या प्रवेशाला स्थगिती दिली. या संपूर्ण राजकीय नाट्यानंतर काशिनाथ चौधरी कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काशिनाथ चौधरी कोण?

काशिनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक महत्त्वाचे स्थानिक राजकारणी आहेत. ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सदस्य होते. त्यांनी डहाणूचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच, त्यांनी जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती हे पद भूषवले आहे. ज्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आणि पकड असल्याचे मानले जाते. काशिनाथ चौधरी यांनी यापूर्वी भाजपच्या तिकिटावर पंचायत समितीची निवडणूक लढवली होती, अशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी कोणतीही अपेक्षा किंवा आश्वासन न ठेवता केवळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे सांगितले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते एका सामान्य आदिवासी कुटुंबातून आले आहेत. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.

गडचिंचले साधू हत्याकांडामुळे चर्चेत

काशिनाथ चौधरी हे २०२० मधील गडचिंचले साधू हत्याकांडाशी जोडले गेल्यामुळे चर्चेत आहेत. चौधरींच्या म्हणण्यानुसार, ते या प्रकरणात आरोपी नसून, केवळ साक्षीदार आहेत. त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. हत्याकांडाच्या वेळी पोलिसांच्या विनंतीवरून ते घटनास्थळावर प्रवाशांना मदत करण्यासाठी गेले होते. यावेळी जमाव दारू प्यालेला होता. त्यामुळे मोठा गोंधळ, दगडफेक सुरू होती. या घटनेमुळे त्यांच्यावर आरोप झाले. तसेच त्यांची प्रतिमा मलिन झाली, ज्यामुळे त्यांचे कुटुंब प्रचंड मानसिक तणावात आहे. राजकीय जीवनात असे आरोप-प्रत्यारोप होत असले तरी, आपल्या कुटुंबाला याचा त्रास होतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

काशिनाथ चौधरींच्या प्रवेशावर भाजपची प्रचंड नाचक्की झाली. कारण २०२० मध्ये भाजपनेच तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर, विशेषतः काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पक्षप्रवेशामुळे भाजपवर मोठी टीका होण्याची शक्यता होती. त्यामुळे तातडीने त्यांनी हा प्रवेश स्थगित करत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. यानंतर काशिनाथ चौधरी यांनी पाच वर्षांपूर्वीपासून साधू हत्याकांडाशी माझा संबंध जोडला गेला आहे. यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे. कालपासून माझे कुटुंब मानसिक तणावाखाली आहे, माझी मुले रडत आहेत. मी फक्त मदत करायला गेलो होतो, असे म्हटले आहे.