जळगाव ते बदलापूर… नेत्यांच्या पत्नी-मुली रिंगणात, कोणाला तिकीट? नावं समोर
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षांकडून नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली जात असल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सध्या राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. राज्यभरात होऊ घातलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. सत्ताधारी पक्षांपासून ते विरोधकांपर्यंत अनेक वरिष्ठ नेत्यांनी कुटुंबातील सदस्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी याच मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे. रोहिणी खडसे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट केले आहे. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीवर घराणेशाहीची टीका करायची आणि दुसरीकडे स्वतःच घराणेशाहीला प्रोत्साहन द्यायचे, हे कसे चालेल? असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अनेक उदाहरणे देत घराणेशाहीचा आरोप केला आहे.
जामनेर – सौ. साधना गिरीश महाजन (मंत्र्यांची पत्नी) मुक्ताईनगर – संजना चंद्रकांत पाटील (आमदारांची लेक) चाळीसगांव – सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण (आमदारांची पत्नी) भुसावल – सौ. रजनी संजय सावकारे (मंत्र्यांची पत्नी) पाचोरा – सौ. सुनीता किशोर अप्पा पाटील (आमदारांची पत्नी) पाचोरा – सौ. सुचिता दिलीप वाघ (भाजप मा.आमदारांच्या पत्नी)
राज्यभरात होणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अनेकांनी अर्ज भरले तसे आमच्या जळगावमध्येही भरण्यात आले. मात्र आमच्या जिल्ह्यात काय अढळतंय पहा.. सत्ताधाऱ्यांची वृत्ती म्हणजे हम करे तो राजनीती तुम करो तो घराणेशाही असा घणाघात रोहिणी खडसे यांनी सत्ताधारी पक्षांना लगावला आहे.
सत्ताधाऱ्यांची वृत्ती म्हणजे ‘हम करे तो राजनीती तुम करो तो घराणेशाही’
वाह भाई वाह !
राज्यभरात होणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अनेकांनी अर्ज भरले तसे आमच्या जळगावमध्येही भरण्यात आले. मात्र आमच्या जिल्ह्यात काय अढळतंय पहा..… pic.twitter.com/NeosvF2BSM
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) November 18, 2025
बदलापूरमध्ये तब्बल १२ पती-पत्नीच्या जोड्या रिंगणात
बदलापूर नगरपालिका निवडणुकीत अशाचप्रकारे घराणेशाहीचा प्रकार पाहायला मिळत आहे. या ठिकाणी तब्बल १२ दाम्पत्ये (पती-पत्नीच्या जोड्या) निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय एकाच कुटुंबातील ६ जण उमेदवार आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून नात्या-गोत्याच्या राजकारणाला महत्त्व देण्यात आले आहे.
भाजपने गटनेते राजेंद्र घोरपडे आणि त्यांच्या पत्नी रूचिता घोरपडे, ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे आणि उर्मिला शिंदे, शहराध्यक्ष रमेश सोळशे आणि हर्षदा सोळसे यांच्यासह ६ दाम्पत्यांना उमेदवारी मिळाली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि विणा म्हात्रे, त्यांचे बंधू तुकाराम म्हात्रे आणि उषा म्हात्रे, तसेच इतर तीन दाम्पत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वामन म्हात्रे यांचे पुत्र आणि पुतण्या देखील रिंगणात आहेत.
वाशिम आणि परभणीतही नेत्यांच्या नातेवाईकांना संधी
जळगाव आणि बदलापूर प्रमाणेच वाशिम जिल्ह्यातही सर्वच पक्षांमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. कुठे पत्नी, कुठे सून,तर कुठे मुलगा निवडणुकीत उतरवल्यामुळे अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सख्ख्या बहीण उर्मिला केंद्रे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. उर्मिला केंद्रे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे बोललं जातं. मात्र अनेक जिल्ह्यात कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून आपल्याच घरातील किंवा कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे सध्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन राज्यभरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
