Kartiki Ekadashi 2025: एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा संपन्न, वारकऱ्यांसाठी घेतला ऑन द स्पॉट निर्णय

पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा झाली. यावेळी मानाचे वारकरी रामराव व सुशिलाबाई वालेगावकर यांचा सत्कार करण्यात आला. शिंदे यांनी शेतकरी सुखी व्हावा आणि महाराष्ट्र प्रगती करावी अशी प्रार्थना केली. तसेच चंद्रभागा प्रदूषणमुक्त करण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.

Kartiki Ekadashi 2025: एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा संपन्न, वारकऱ्यांसाठी घेतला ऑन द स्पॉट निर्णय
eknath shinde kartiki ekadashi
| Updated on: Nov 02, 2025 | 8:23 AM

कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा विधीवत संपन्न झाली. पहाटे २ वाजून २० मिनिटांनी ही महापूजा सुरू झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्यासह शासकीय महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल झाले होते. यंदा कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी होण्याचा बहुमान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील रामराव बसाजी वालेगावकर आणि त्यांच्या पत्नी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना मिळाला.

वालेगावकर दाम्पत्य गेल्या २० वर्षांपासून वारी करत आहे. या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी होण्याचा बहुमान मिळाल्यानंतर त्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. पांडुरंगाच्या कृपेमुळे आम्हाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्र्यांनी मानाचे वारकरी असलेल्या या दाम्पत्याला एक वर्षाचा एस.टी. बस पास भेट म्हणून दिला.

महत्त्वाचे ऑन द स्पॉट निर्णय जाहीर

या महापूजेनंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक महत्त्वाचे ऑन द स्पॉट निर्णय जाहीर केले. यासोबतच एकनाथ शिंदेंनी राज्यातील शेतकऱ्यांवरील अरिष्ट दूर व्हावे, बळीराजा सुखी व्हावा आणि महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रांत देशात नंबर एक व्हावे, असे साकडे विठ्ठलाकडे घातले. तसेच एकनाथ शिंदेंनी पूजेचा मान आणि संधी चौथ्यांदा मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या ठिकाणी व्हीआयपी लोक आम्ही नाही. याठिकाणी वारकरी व्हीआयपी आहेत. मी देखील शेतकरी व वारकरी कुटुंबातून आलो आहे. एक सामान्य कार्यकर्ता आणि शाखाप्रमुख राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणे ही पांडुरंगाचीच कृपा आहे. चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, ही वारकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिले.

आषाढीची महापूजा करायला आवडेल

पंढरपूरच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ५ कोटी रुपये तातडीने दिले. तसेच मंदिर समितीला पर्यटक निवासाची जागा ३० वर्षांसाठी करार वाढवून देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी जाहीर केला. आषाढीची महापूजा करायला आवडेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महापूजेनंतर प्रतिक्रिया दिली. तसेच आगामी निवडणुकीसाठी विठ्ठल एकनाथ शिंदे साहेब यांना ताकद देईल, असेही त्या म्हणाल्या.

पंढरपुरात जवळपास सात लाख भाविक दाखल

आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही एकादशींना महापूजा करायला मिळाली, हे आमचे भाग्य आहे. पुढील वर्षी आषाढी वारीची शासकीय महापूजा करायला आपणास निश्चित आवडेल,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावर्षी मानाच्या वारकऱ्यांबरोबरच जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन शाळकरी विद्यार्थ्यांनाही महापूजेला उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली होती. या निर्णयावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना पूजेचा मान द्यायचा की नाही, हा मंदिरे समितीचा निर्णय आहे. पण, उद्या कुणीही मागणी करेल. महापूजा बाबत मंदिरे समितीने योग्य निर्णय घ्यावा, असे जयकुमार गोरे म्हणाले.

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात जवळपास सात लाख भाविक दाखल झाले आहेत. वारकरी संप्रदायात चंद्रभागेच्या स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज पहाटे चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.