
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंढरपूरकर गेल्या चार दिवसापासून भीतीच्या छायेत आहेत. कारण पंढरपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून गूढ आवाज येत आहे. हा आवाज का येत आहे? कशाचा आहे? याची काहीच माहिती नाहीये. पण वारंवार आवाज येत असल्याने काही तरी आक्रित घडणार का? अशी भीती पंढरपूरकरांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे अख्खं शहर हादरून गेलं आहे. त्यातच प्रशासनाकडूनही म्हणावी तशी पावलं उचलली जात नसल्याने येथील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.
पंढरपूर शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून अचानक हा आवाज येत आहे. नुसता गूढ आवाज येत नाहीये तर तो प्रचंड असा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरुवातीला ग्रामस्थांनी या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. पण रोज हा आवाज येत असल्याने आणि मोठ्या प्रमाणात येत असल्याने येथील नागरिक हादरून गेले आहेत. अनेकांना तर रात्रीची झोपही लागत नाहीये.
दारं खिडक्या हलल्या
हा आवाज इतका तीव्र आहे की अनेक ठिकाणी घरांच्या दार-खिडक्या हादरत असल्याचं नागरिक सांगत आहेत. अचानक घरांची दारं आणि खिडक्या हादरायला लागल्याने नागरिकांमध्ये अधिकच भयाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. विशेष म्हणजे हा आवाज नेमका कुठून येतो? कशामुळे येतो? याबाबत प्रशासनालाही अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. गेल्या चार दिवसात आवाजाचा काहीच मागमूस लागलेला नाहीये, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ बिथरले आहेत.
चौकशी करा
या गूढ आवाजाबाबत सोशल मीडियावरही विविध तर्कवितर्क लावले जात आहे. त्यामुळे हा आवाज कशाचा येतो? त्याचे कारण काय? त्यामुळे जीवित वा वित्तहानी तर होणार नाही ना? ही मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना? असे प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामुळे या गूढ आणि प्रचंड आवाजाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
भूकंप तर नाही ?
या गूढ आवाजामुळे अनेकजण तर्कवितर्क लढवत आहेत. या आवाजामुळे अनेकांना भूकंप होण्याची भीती वाटत आहे. भूकंप वगैरे तर होणार नाही ना? याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाकडून या आवाजाबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.