पंकजा मुंडे पहिल्यांदाच धनंजय मुंडेंसोबतच्या नात्यावर स्पष्ट बोलल्या, थेट सुनेत्रा पावारांसमोरच मोठी घोषणा
परळीमध्ये पशुवैद्य व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशीला समारंभ व भूमिपूजन सोहळा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडला, या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.

परळीमध्ये पशुवैद्य व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशीला समारंभ व भूमिपूजन सोहळा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे. यावेळी पशुसंवर्धन तसेच पर्यावरणीय व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे,आमदार नमिता मुंदडा, माजी खासदार डॉ प्रीतम मुंडे यांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे. मथुरेवर सतत अतिक्रमण केल्यामुळे कृष्णाला द्वारका उभी करावी लागली. आपसातल्या संघर्षामुळे विकासाचा खून होतो, मी मंचावरून सांगते की आमचा संघर्ष नाही, असं यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मथुरेवर सतत अतिक्रमण केल्यामुळे कृष्णाला द्वारका उभी करावी लागली, आपसातल्या संघर्षामुळे विकासाचा खून होतो. मी मंचावरून सांगते की आमचा संघर्ष नाही, संघर्षाची शिकवण मुंडे साहेबांनी दिली, मला अजितदादांच्या शोकसभेत विधानसभेत बोलायचं होतं.
इथे देवा भाऊंच्या लाडक्या बहिणी देखील आलेल्या आहेत. आता मुख्यमंत्री लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत, आपल्याला काम लवकर करायचं आहे. हा शासनाचा पैसा आहे हा व्यवस्थित वापरला गेला पाहिजे, येथील विद्यार्थ्यांनी मी शिकलो, असं सांगितलं पाहिजे, असं यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे, ग्रामीण उद्योजकांसाठी आता 50 टक्के सबसिडी मिळणार आहे. आज इथे सुनेत्रा वहिनीच नाही आल्या तर अजितदादा यांचा आशीर्वाद देखील इथे आला आहे. राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मराठवाड्याच्या आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. कधी काळी एकमेकांच्या विरोधात असलेले दोन कुटुंब युतीमुळे एकत्र आले. आम्ही एकमेकांच्या विरोधात प्रचार केला, मात्र दादा उपमुख्यमंत्री झाल्यावर आम्ही अनेकदा सोबत प्रवास केला . बऱ्याच गप्पा मारल्या
मुंडे साहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे, असंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.