नद्या, नाल्यांमध्ये उतरताना सावधान.. कुणी पोहायला गेलं तर कुणाला अंदाजच आला नाही, पनवेलमध्ये 4 दिवसात 7 जणांचा बुडून मृत्यू

पनवेल तालुक्यात गेल्या चार दिवसांत पाण्यात बुडून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. करंजाडे, आपटा, दिघाटी, खारघर यांसह विविध ठिकाणी या घटना घडल्या. प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले, तलावांमध्ये उतरू नये, विशेषतः मद्यपान करून पाण्यात जाऊ नये असे आवाहन केले आहे. पावसाळ्यात जीविताचा धोका टाळण्यासाठी सुरक्षिततेचे नियम पाळा.

नद्या, नाल्यांमध्ये उतरताना सावधान.. कुणी पोहायला गेलं तर कुणाला अंदाजच आला नाही, पनवेलमध्ये 4 दिवसात 7 जणांचा बुडून मृत्यू
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 08, 2026 | 1:10 PM

मुसळधार पावसाने राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढला आहे. नद्यांच्या पाणी पातलीत वाढ झाली असून काहींनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर काही तलावही दुथडी भरून वाहू लागले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनाही होत असून प्रशासनातर्फे नागरिकांना सावध राहण्याचे, जपून चालण्याचे, प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरीही पावसामुळे काही ठिकाणी लोकांचा बळी गेला असून पनवेलमध्येही अनेकांनी जीव गमावला आहे. पनवेल तालुक्यात गेल्या चार दिवसांत घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. करंजाडे, आपटा, दिघाटी, खारघर आणि धोदाणी परिसरात या दुर्घटना घडल्या असून, सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

चार दिवसांत 7 जणांनी गमावला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी करंजाडे येथील एका इमारतीच्या लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून परेश ढोले (वय ३६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याने भरलेल्या या खड्ड्यात बुडून त्यांचा जीव गेला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर त्याच्या पुढल्याच दिवशी 3 जुलै रोजी खारघर येथील पांडवकडा धबधबा परिसरात दोन तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात सापडले. मोहम्मद शाहिद (रा. तळोजा फेज-१) आणि शेंणोन गॅसपर किनी (रा. सांताक्रूझ, मुंबई) हे दोघे पाण्यात वाहून गेले. ते बुडाल्याची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य राबवण्यात आलं, मात्र त्यांना वाचवण्यात यश मिळालं नाही.

10 वीचा विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता

दुर्घटनांची ही मालिका अशीच सुरू राहिली. 4 जुलै रोजी आपटा येथील प्रज्वल प्रदीप कांबळे (वय 15), हा दहावीचा विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचा शोध सुरू होता. अखेर 5 जुलै रोजी उरण तालुक्यात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच दिवशी दिघाटी येथील मच्छिंद्र गणपत गावंड हेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून, त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.

दरम्यान,5 जुलै रोजी धोदाणी गावातील वाघाची वाडी परिसरात नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सुमित पवार आणि नयन म्हात्रे (रा. विचुंबे) या दोघांचा बुडून मृत्यू झाला. चार दिवसांत सात बळी गेल्याने पनवेल तालुक्यात पावसाळ्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात नद्या, नाले, धबधबे आणि धरण क्षेत्रांमध्ये अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो. अशा ठिकाणी पोहण्याचा मोह अनेकदा जीवावर बेततो.

प्रशासनाने नागरिकांना धोकादायक जलस्रोतांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः दारू पिऊन पाण्यात उतरणं, खोल पाण्यात जाणं किंवा सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांनी खबरदारी घेतली नाही तर पावसाळ्यातील आनंद क्षणात दुःखात बदलू शकतो, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रशासनाने केलंय.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us