Omraje Nimbalkar : ओमराजेंना कोर्टाचा झटका… फडणवीस आणि शिंदेंची अमित शाहांसोबत चर्चा; शाह यांच्या सूचना काय?
मुंबई उच्च न्यायालयाने पवनराजे हत्याकांडात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे, ज्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना धक्का बसला आहे. पुराव्याअभावी ही सुटका झाली असून, ओमराजे आता वरच्या न्यायालयात दाद मागणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सीबीआयला या प्रकरणी वरच्या कोर्टात अपील करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पवनराजे हत्याकांडाचा निकाल अखेर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्यातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. पुराव्या अभावी या सर्व आरोपींना सोडून देण्यात आलं आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी पद्मसिंह पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका बसला आहे. या घटनेनंतर आता या प्रकरणी वरच्या न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या प्रकरणी वरच्या कोर्टात दाद मागण्याच्या सूचना सीबीआयला दिल्याची माहिती समोर आली आहे.
फडणवीस आणि शिंदेंची अमित शाहांसोबत चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज कोल्हापुरात आहेत. एका कार्यक्रमानिमित्ताने अमित शाह आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कोल्हापुरात आहेत. या खटल्याचा निकाल येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली. या निकालाची सर्व माहिती अमित शाह यांना देण्यात आली. अमित शाह यांनीही प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर तात्काळ सीबीआयला या प्रकरणी वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काय सांगितलं ?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज कोर्टाचा निकाल आलाय. सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. कारण पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्यासह दोन लोकांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. हे अतिशय गंभीर प्रकरण होतं. या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा मिळेल असा विश्वास कुटुंबीय आणि इतरांना होता, मात्र दुर्दैवाने विशेष न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी मी स्वत: आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आम्ही दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात सीबीआय हायकोर्टात जाऊन अपील करा आणि केस लढवा, असे निर्देश अमित शाह यांनी सीबीआयला दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केलं.
सीडी बाहेर आली अन्…
दरम्यान, या निकालानंतर पद्मसिंह पाटील यांच्या वकिलाने मीडियाशी संवाद साधला. या खटल्याच्यावेळी तानाजी पाटीलची नार्को टेस्ट करण्यात आली होती. ती सार्वजनिक करण्यात आली. उच्च न्यायालयात प्रकरण पेंडिग असताना ही सीडी बाहेर आली. त्यातून पद्मसिंह पाटलांवर संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आणि प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आली. 2008 ला सीबीआयकडे हे प्रकरण गेलं. पण 2009 पर्यंत त्यात काही घडलं नाही. कोणताही पुरावा मिळाल नाही, असं वकिलाने सांगितलं.
मंत्री होऊ नये म्हणूनच…
2009मध्ये पद्मसिंह पाटील निवडून आले. ते केंद्रात मंत्री होणार होते. ते मंत्री होऊ नये म्हणून कुंभाड रचण्यात आलं, असा दावा वकिलाने केला आहे. या प्रकरणी पुरावे कसे गोळा केले? कुणाचा काय उद्देश होता? पद्मसिंह पाटलांना का टार्गेट करण्यात आलं? प्रत्येक निवडणुकीत त्यांना याच मुद्द्यावरून बदनाम करण्यात आलं. हे फार चुकीचं होतं, असंही वकिलाने सांगितलं.
