फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण, प्रशांत बनकर आणि पीडितेचा नेमका संबंध काय? कोर्टातून महत्त्वाची माहिती समोर

फलटणमध्ये महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे, या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी असलेल्या प्रशांत बनकर संदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण, प्रशांत बनकर आणि पीडितेचा नेमका संबंध काय? कोर्टातून महत्त्वाची माहिती समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2025 | 6:01 PM

फलटणमध्ये गेल्या आठवड्यात एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली, तीने हॉटेलच्या एका रूममध्ये गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, या घटनेनं संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली असून, आता वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान या डॉक्टरने मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामध्ये तिने पीएसआय गोपाळ बदाने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गोपाळ बदाने याने आपल्यावर चार वेळा अत्याचार केला, तर प्रशांत बनकर गेल्या काही दिवसांपासून आपला मानसिक आणि शारीरिक छळ करत होता असा आरोप या पीडित महिला डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला होता.

दरम्यान त्यानंतर तातडीनं पीएसआय गोपाळ बदाने याचं निलंबन करण्यात आलं होतं,  प्रशांत बनकर याला अटक केल्यानंतर गोपाळ बदाने हा देखील पोलिसांना शरण आला, त्याला न्यायालयानं पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे, तर प्रशांत बनकर याला आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याच्या पोलीस कोठडीत आणखी तीन दिवसांची 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

यावेळी झालेल्या युक्तीवादामध्ये सरकारी वकिलांकडून न्यायालयात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून क्षमा बांदल यांनी युक्तीवाद केला तर आरोपी प्रशांत बनकर याच्या वतीने  सुनील भोंगळ यांनी युक्तीवाद केला आहे.

सदर आरोपीने शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन पीडितेला आत्महत्येस प्रवृत्त केलेलं आहे. सदर आरोपीने सलग चार महिने मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे.  कागदपत्र आणि डिजिटल पुरावे गोळा करायचे बाकी आहेत,  कॉल डिटेल्स मिळालेले आहेत, मात्र त्याचं विश्लेषण बाकी आहे. छळ नेमका कुठे आणि कशाप्रकारे केला याचा देखील तपास करायचा आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते का? दोन्ही आरोपींचा काही संबंध आहे का? याचा तपास करायचा आहे, यासाठी पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी या प्रकरणात सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती.

तर  मागच्या वेळी कोठडी मागताना जी कारणं दिली होती, तीच कारणं देऊन पुन्हा कोठडी मागितली जात आहे. कॉल डिटेल्स विश्लेषण करण्यासाठी आरोपीची गरज नाही. पुन्हा त्याच त्याच मुद्द्यांवर कोठडी देणे योग्य नाही, त्यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी यावेळी आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आली होती, न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रशांत बनकर याला पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.