
पुण्यात झालेल्या एका अपघातामुळे मोठी खळबळ उडाली. एक आलिशान कार भरधाव वेगाने आली आणि तिने मागून रिक्षाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जास्त भयंकर होती की, रिक्षा तीन वेळा पलटी झाली. हैराण करणारे म्हणजे या अपघातानंतर रिक्षाचालक हा गंभीर जखमी असूनही त्याला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. फक्त हेच नाही तर गाडीमधील लोक उतरून निघून गेली आणि रिक्षाचालक गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून राहिला. रिक्षाचालकाला स्थानिकांनी रूग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळात एक व्यक्ती तिथे आली आणि अपघातग्रस्त गाडी टोईंग व्हॅन करून घेऊन गेली. धक्कादायक म्हणजे ही गाडी दुसरी तिसरी कोणाचीही नसून गाैतमी पाटील हिची आहे.
गौतमी पाटील हिच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षाचालक कुटुंबिय कारवाईची मागणी करत आहे. फक्त कारवाईच नाही तर गाैतमी पाटीलला अटक करण्याचीही मागणी आता जोर धरू लागली आहे. ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले. रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी अत्यंत गंभीर आरोप केली असून पोलिस सहकार्य करत नसल्याचा त्यांनी दावा केला.
चंद्रकांत पाटील यांचा याबद्दलचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांनी थेट डीसीपींना फोन करून याबद्दलची माहिती घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी आता विशेष पथक या प्रकरणात नेमले असून नुकताच अपघात झाल्यानंतर वाहन ज्या क्रेनच्या साह्याने अपघात स्थळावरून हलवण्यात आले. त्या ट्रेनचालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. अपघात झाल्यानंतर गौतमी पाटीलच्या वाहनचालकाने ते क्रेन अपघातस्थळी बोलवल्याचे पोलीस तपासातून समोर आलंय.
गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणात पोलिसांवर दबाव वाढल्याचे बघायला मिळत आहे. चंद्रकांत पाटलांचा पाठोपाठ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याप्रकरणात फोन केला. सदर गुन्ह्यातील प्रोग्रेस रिपोर्ट तात्काळ सादर करा सिंहगड रोड पोलीस स्थानकाचा पोलीस वरिष्ठ निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आदेश दिला. यामुळे आता गाैतमी पाटील ही चांगलीच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.